Railway Track Tendernama
विदर्भ

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे 'ते' स्वप्न रेल्वेकडून प्रत्यक्षात येणार; 332 कोटी मंजूर

टेंडरनामा ब्युरो

गडचिरोली (Gadchiroli) : जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित वडसा-देसाईगंज 52 किलोमीटरच्या रेल्वेकामाला अखेर सुरुवात झाली आहे. जाचक वनकायद्यांचा अडसर दूर झाला असून, मोठ्या प्रतिक्षेनंतर रेल्वे रुळावर येणार असल्याने जिल्हावासीयांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

जिल्ह्यात इंग्रजांच्या काळातील एकमेव रेल्वेस्थानक वडसा येथे आहे. दुर्गम, मागास, आकांक्षित जिल्ह्यात वडसा तालुक्यातून केवळ 18.48 किलोमीटरचा रेल्वेमार्ग गेलेला आहे. जिल्हा मुख्यालय असूनही गडचिरोलीत रेल्वेची सोय नव्हती, त्यामुळे दळणवळणासाठी एसटी बसशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वडसा ते गडचिरोली हा 52 किलोमीटर रेल्वेमार्ग व्हावा, अशी अनेक वर्षांची मागणी होती.

2011 मध्ये या मार्गाला मंजुरी मिळाली. मात्र, जाचक वनकायदे व रेल्वेमार्ग परिसरात वाघांचा वावर असल्याने अडचणी येत होत्या. 13 वर्षांनंतर या सर्व परवानग्या मिळाल्या असून, आता थंड्याबस्त्यात गेलेल्या रेल्वेमार्गाच्या कामाला मागील आठवड्यात देसाईगंज रेल्वेस्थानकापासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

रेल्वेमार्गावर उभारणार पूल

वडसा ते आरमोरी यादरम्यान वन्यजीवांची वर्दळ असते. या मार्गात वनकायद्यांचा मोठा अडसर होता. पण वन्यजीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने या मार्गावर रेल्वेसाठी पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत 1096 कोटीवरून 1888 कोटी रुपये झाली आहे. 1096 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी 50 टक्के निधी देणार आहे. प्रथमच 20 किमीचे काम होणार असून, सुमारे 322 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

वडसा-देसाईगंज रेल्वेमार्ग म्हणजे जिल्हावासीयांनी पाहिलेले दिवास्वप्न आहे. यापूर्वीच्या राज्य सरकारच्या कार्यकाळात वनकायद्यांच्या अडचणी दूर झाल्या नव्हत्या. आताच्या सरकारने या सर्व परवान्या मिळवल्या, त्यामुळे या कामाला प्रत्यक्ष सुरवात झाल्याचा आनंद आहे. गडचिरोलीचा हा रेल्वेमार्ग पुढे छत्तीसगड, तेलंगणापर्यंत विस्तार करण्याचा प्रयत्न आहे.