Rojgar Hami Yojana Tendernama
विदर्भ

Gadchiroli : जिल्ह्यातील 50 हजार मजुरांना दिलासा; थकलेले 30 कोटी...

टेंडरनामा ब्युरो

गडचिरोली (Gadchiroli) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (MHNAREGA) 2024च्या जानेवारी महिन्यापासून विविध कामे करण्यात आली. मात्र सरकारने अनुदान न दिल्याने जिल्ह्यातील सुमारे 50 हजार मजुरांची 32 कोटी रुपयांची मजुरी थकीत असल्याने मजूर आर्थिक संकटात सापडले होते.

दरम्यान, एप्रिलअखेर मनरेगाच्या मजुरीसाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. चार दिवसांत टप्प्याटप्प्याने कामगारांच्या बँक खात्यात 30 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. म्हणून कामगारांना दिलासा मिळाला आहे. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांची बदली रोखून त्यांना त्यांच्या हातात काम मिळावे तसेच कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वैयक्तिक लाभ मिळावा या उद्देशाने विविध कामे केली जातात. मात्र काम करूनही मजुरी खात्यात जमा होत नसल्याने मजूर पंचायत समिती आणि बँकेत फेऱ्या मारत होते. जिल्ह्यातील सुमारे 50 हजार मजुरांची मजुरी थकीत असल्याने मजुरांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. अशा परिस्थितीत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वेतनाची रक्कम सरकारकडून कामगारांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. याअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 50 लाख मजुरांच्या खात्यात 30 कोटी रुपयांची मजुरी जमा झाल्यामुळे मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तीन महिन्यांपासून कामगार बँकेच्या चकरा मारत होते : 

रोहयो अंतर्गत काम करूनही मजुरी बँक खात्यात जमा होत नसल्याने गेल्या तीन-चार महिन्यांपासून मजूर अडचणीत सापडले होते. 24 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने त्यांच्या बँक खात्यात वेतनाची थकबाकी जमा होण्यास सुरवात झाली आहे.