Jal Jeevan Mission Tendernama
विदर्भ

Gadchiroli News : 'जल जीवन'ची कामे करणाऱ्या 'त्या' ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार!

टेंडरनामा ब्युरो

Gadchiroli News गडचिरोली : संपूर्ण राज्यात राज्य सरकारकडून जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल अशी योजना राबविली जात आहे. पण  गडचिरोलीत जिल्ह्यात पाणी योजनांची कामे धीम्या गतीने सुरू आहेत. योजनांवर पाण्यासारखा पैसा खर्च करूनही लोकांचा पाणी मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

जिल्ह्यात 235 योजनांची कामे रखडलेली आहे, तर संबंधित ठेकेदारांना ब्लैकलिस्टेड करण्यात येणार आहे. सोबतच कामचुकार अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करुन कारवाईचा इशारा दिला आहे.

जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. नागरिकांना तातडीने पाणी मिळावे यासाठी कोणत्याही परिस्थितीत योजनेच्या कामांना उशीर होऊ नये, ग्रामीण व दुर्गम भागात पावसाळ्यातही कामे बंद पडू नये याची दक्षता घेऊन रेती, गिट्टी, सिमेंट आदी साहित्यसाठा आताच उपलब्ध करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

योजनांची कामे कासवगतीने करणाऱ्या ठेकेदारांना ब्लैकलिस्टेड केले जाणार असून, अधिकाऱ्यांकडूनही माहिती मागविली जाणार आहे.

जि. प. सीईओ आयुषी सिंह यांचे पाणी योजनांची कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याकरता त्या नियमित आढावाही घेतात, पण खालच्या स्तरावर काही अधिकारी कामचुकारपणा करतात, त्यामुळे योजनांबाबत नागरिकांतून ओरड होत आहे. काही अधिकारी कामांना नियमित भेटी देत नाहीत, नागरिकांच्या आक्षेपानंतर ठेकेदाराला जाब विचारत नाहीत, तसेच ठेकेदारांशी अधिकाऱ्यांची हातमिळवणी असल्याची चर्चाही आहे.

निधी जिरला, पाण्याचे काय ?

दरम्यान, काही गावांमध्ये योजनांची कामे किरकोळ दुरुस्ती, थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडल्याने बंद आहेत. याचा फटका तेथील नागरिकांना बसत आहे. निधी मुरला, पण पाण्याचे काय, असा सवाल यामुळे उपस्थित केला जात आहे.