uday samant tendernama
विदर्भ

Gadchiroli : गडचिरोलीचे नामकरण लवकरच उद्योगनगरी होणार.. असे का म्हणाले उदय सामंत?

टेंडरनामा ब्युरो

गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोलीत 35 हजार कोटीचे प्रकल्प सुरू होणार आहेत. मोठ-मोठ्या कंपन्या येथे उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असल्याने एकंदरीत उद्योगनगरी असे गडचिरोलीचे नामकरण होणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.

सुरजागड इस्पात स्टील प्रकल्पाचे बुधवारी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सामंत म्हणाले की, दावोस कराराच्या अंमलबजावणीचे उदाहरण म्हणजे भूमिपूजन झालेला हा कार्यक्रम आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा गुंतवणूक परिषदेअंतर्गत नागपूर विभागात तब्बल 5 हजार कोटींचे उद्योग येणार असून पुढील एक ते दोन महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात दीड लाख कोटीचे प्रकल्प येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कोटींची खनिज संपत्ती येथील आदिवासी समाजाला आर्थिक सुबत्ता देऊन जाईल. त्यानिमित्त जिल्ह्यात येणार्‍या हजारो कोटी गुंतवणुकीचा येथील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्य शासनातर्फे शेतकर्‍यांना सक्षम करण्याचे काम करण्यात येत आहे. या अनुषंगाने वीजबिलात माफी, धानाला बोनस, दर्जेदार शिक्षण, पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा अशा विविध सवलतीच्या योजनांसोबतच आता महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये मदत पात्र महिलांना देण्याची योजना आमचे शासन राबवत असल्याचे ते म्हणाले. गडचिरोली हे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र बनेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात शिक्षण, सिंचन आणि रोजगार निर्मितीचे लक्ष पूर्ण करून क्रांती घडवून आणायची असल्याचे सांगितले. हा प्रकल्प 10 हजार कोटी रुपयांचा असून यातून 7 हजार पेक्षा अधिक स्थानिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. संपूर्ण प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कंपनीत नियुक्त 16 सुरक्षारक्षकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याशिवाय स्टील प्लांटतर्फे रुग्णवाहिका व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील मान्यवर, संबंधित अधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.