गडचिरोली (Gadchiroli) : एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर दोन वर्षांपासून सुरू असलेल्या लोहखनिजाच्या वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अपघात वाढल्याने रस्ता सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर होता. या पार्श्वभूमीवर अखेर राज्य सरकारने नवेगाव मोर ते सूरजागड 83 किलोमीटर लांबीच्या 'ग्रीनफिल्ड' विशेष महामार्ग 7 फेब्रुवारीला मंजूर केला आहे. त्यामुळे धूळ, प्रदूषण व अपघातातून नागरिकांची सुटका होणार आहे.
सूरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू झाल्याने प्रशासन इतर खाणपट्टे खुले करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे उत्खनन केलेल्या खनिजाची सुरळीत वाहतुकीकरिता 'मायनिंग कॉरिडॉर' निर्माण करण्याची गरज होती.
वर्षभरापूर्वी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणादेखील केली होती. 7 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढून नावेगाव मोर ते सूरजागड अशा 83 किमीच्या विशेष महामार्गाला मान्यता दिली. यामुळे राज्याच्या विकसित भागांत खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीतपणे आणि किफायतशीर किमतीत होण्यास मदत होणार आहे.
सोबतच वाहतुकीमुळे सुरू असलेली अपघातांची मालिकादेखील खंडित होणार असून, आसपासच्या गावांना धुळीपासून मुक्ती मिळणार आहे. यामुळे जिल्ह्याला समृद्धी आणि भारतमालासारखे शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचे कार्य सुरू झाले आहे.
कोनसरीच्या प्रकल्पात सुमारे 15 हजार रोजगार निर्मिती होऊन परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास होईल. याशिवाय रस्त्यामुळे या भागातील आदिवासी गावांना आरोग्यविषयक सुविधांबरोबर इतर शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यास मदत होणार असल्याचा दावा शासन परिपत्रकात केला आहे.
असा असणार नियोजित मार्ग
मुत्तापूर-वडलापेठ-वेलगूर-टोला-येलचिल (इजिमा) या मार्गासोबत आता नवेगाव मोर-कोनसरी- मुलचेरा-हेडरी ते सुरजागड खाणीपर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या विशेष महामार्गावरून केवळ खनिजाची वाहतूक होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.