water shortage (Pani) Tendernama
विदर्भ

Gadchiroli : 3 कोटींचा खर्च मग 'या' वाढीव पाणी योजनेवर प्रश्नचिन्ह का?

टेंडरनामा ब्युरो

गडचिरोली (Gadchiroli) : आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे 'हर घर जल' योजनेअंतर्गत अंदाजे 2.75  कोटी रुपये खर्च करून गोरजाई डोहाच्या खालील भागात वाढीव पाणीपुरवठा योजना जानेवारी 2024 मध्ये कार्यान्वित झाली; पण गावांतर्गत असलेल्या पाइपलाइनमध्ये त्रुटी असल्याने गावातील अनेक नळधारकांना पाणी मिळत नसल्याने नव्याने कार्यान्वित झालेल्या पाणीपुरवठा योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पाणी योजनेवर पावणेतीन कोटी रुपये खर्च करूनही गावातील शंभरवर घरांना नळाचे थेंबभरही पाणी मिळत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मागील 20 वर्षांपासून उन्हाळ्यात वैरागड येथे पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. केंद्र सरकारच्या "हर घर जल" योजनेअंतर्गत वैरागड येथे वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. नियोजित वेळेत वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. गोरजाई डोहाच्या खालील भागात ज्या ठिकाणी पाण्याचा चांगला स्त्रोत आहे. त्या ठिकाणी विहिरीचे बांधकामही पूर्ण झाले.

ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कुरखेडाच्या शाखा अभियंत्यांच्या मार्गदर्शनात नळ योजनेचे काम पूर्ण करण्यात आले. पाण्याचा स्रोत मिळण्यासाठी नदीपात्रात देखील एक अतिरिक्त विहीर बांधण्यात आली, त्यामुळे पाण्याचा साठा भरपूर आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावात 1 हजार 268 नळजोडणी देण्यात आली आहे. 

गावातील 90 टक्के नळधारकांना पुरेसे पाणी मिळत आहे; पण 10 टक्के नळधारकांना पिण्यापुरते ही पाणी मिळत नसल्याने त्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर कमालीची नाराजी व्यक्त केली आहे. नवीन पाणीपुरवठा योजना होऊनही या कुटुंबांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याबाबत ग्राम पंचायतीचे नियोजन अपयशी ठरले आहे.

अकुशल कामगारांनी केलेले काम : 

गावांतर्गत पाइपलाइन टाकताना चढ-सकल असा भाग पाहून पाइपलाइनचे योग्य नियोजन करणे आवश्यक होते; पण कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे गावातील काही नळधारकांना पाणी मिळत नाही.

नळ योजनेतील गावांतर्गत पाइपलाइन टाकताना कुशल कामगार नव्हते. जेसीबीच्या साह्याने खोदकाम करण्यात आले आणि सरळ पाइपलाइन टाकण्यात आली. चढ-उतार बघून व्हॉल्व्ह देण्यात आले नाही. त्यामुळे गावातील काही नळधारकांना पाणी मिळत नाही. एकूणच या योजनेचे काम सदोष झाल्याचा लोकांचा आरोप आहे.

उंच भागातील 50 ते 60 नळधारकांना वाढीव नळ योजनेचे पाणी नळाला येत नाही, अशा तक्रारी आहे. त्यासाठी 4 जूननंतर आचारसंहिता संपली की, त्याचे आर्थिक नियोजन करून ते काम हाती घेण्यात येणार आहे. पाईपलाईनमध्ये काही त्रूटी आहेत, त्या दूर करण्याचे संबंधित कंत्राटदाराला सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सरपंच संगीता पेंदाम यांनी दिली.