Railway Tendernama
विदर्भ

Chandrapur : गडचांदूर-आदिलाबाद रेल्वे मार्गाचा प्रश्न अधांतरीच! रेल्वे मार्ग होणार?

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणारा गडचांदूर-आदिलाबाद रेल्वे मार्गाचा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग होणार की नाहीं, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, या मार्गाचे यापूर्वी सर्वेक्षणही करण्यात आलेले आहे. यात पन्नास टक्के राज्य सरकार व पन्नास टक्के केंद्र सरकार यांच्या संयुक्त भागीदारीतून हा प्रकल्प साकारण्यात येणार होता. 

परंतु अनेक अर्थसंकल्पात तरतूद होऊनही या रेल्वे प्रकल्पाचा अजूनही श्रीगणेशा होऊ शकला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर हे सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध शहर आहे. येथून तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्हा मुख्यालयाला हा थेट रेल्वे मार्ग जोडणे अपेक्षित आहे. या मार्गामुळे बल्लारशा रेल्वे जंक्शनपासून मुंबईसाठी दुसरा पर्यायी रेल्वे मार्ग तयार होईल, तसेच हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, नागपूर आदी मोठ्या महानगरांशी येथील कनेक्टिव्हिटी जुळेल, ज्याचा फायदा औद्योगिक, कृषी, पर्यटन, दळणवळण आदी क्षेत्राला मुख्यत्वे होईल.अतिदुर्गम भागातील गावे ही रेल्वे मार्गाशी जुळली जाईल. हा संपूर्ण 77 किलोमीटरचा रेल्वे मार्ग निर्माण झाल्यास चंद्रपूर आदिलाबाद-नांदेड या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासालाही मोठा हातभार लागेल. या रेल्वे मार्गासाठी केंद्र स्तरावर व्यापक हालचाली होणे अपेक्षित आहे. परंतु याला अजूनही ठेंगाच मिळत असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे.

या शहराचे वाढेल महत्त्व : 

हा रेल्वे मार्ग झाल्यास बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर, कोरपना, बेला, जैनत, आदिलाबाद या शहरांना मोठे महत्त्व प्राप्त होईल. नवीन रेल्वे स्थानके निर्माण होऊन प्रवासीदृष्ट्या नवा पर्यायी मार्ग सुकर होईल. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.