Rojgar Hami Yojana Tendernama
विदर्भ

Gadachiroli : जिल्ह्यातील सव्वादोन लाख मजुरांमध्ये असंतोष; 32 कोटी रुपयांची मजुरी का थकली?

टेंडरनामा ब्युरो

गडचिरोली (Gadachiroli) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कामे घेऊन नोंदणीकृत मजुरांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून केलेल्या कामाचा मोबदला न मिळाल्याने रोहयो मजुरांमध्ये शासनाच्या धोरण व कारभाराप्रती तीव्र नाराजी दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 2 लाख 29 हजार 180 मजुरांची 32 कोटी 7 लाख 98 हजार 976 रुपयांची मजुरी प्रलंबित आहे.

डिसेंबर 2023 व जानेवारी ते मार्च 2024 या चार महिन्यांच्या कालावधीत काम केलेल्या नोंदणीकृत मजुरांच्या बँक खात्यावर शासनाकडून एकही रुपया जमा करण्यात आला नाही. विशेष म्हणजे मजुरांच्या मजुरीची पैसे अदा करण्यासाठी शासनाकडून निधी येत नसल्याने प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाली आहे.

जिल्ह्याच्या बाराही तालुक्यांत व रोजगार हमी योजनेअंतर्गत बोडी, मजगी, शौचालय, शेततळे, रस्ते अशी विविध कामे केली जातात. कुशल व अकुशल कामांचा निधी प्राप्त होत नसल्याने या योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम झाला आहे. रोहयोअंतर्गत 50 टक्के कामे ग्रामपंचायतीच्या स्तरावर व 50 टक्के कामे यंत्रणा स्तरावर केली जातात. यातील कुशल कामे 40 टक्के व अकुशल कामांचे प्रमाण 60 टक्के ठेवणे नरेगा कायद्याने बंधनकारक आहे.

प्रलंबित रोहयो मजुरीचा तालुकानिहाय तपशील : 

अहेरी - 46,49,967

आरमोरी - 4,30,77,355

भामरागड -84,84,528

चामोर्शी - 3,92,84,079

देसाईगंज - 1,67,11,557

धानोरा - 7,30,90,610

एटापल्ली - 34,31,964

गडचिरोली - 5,46,14,828

कोरची - 3,08,87,686

कुरखेडा - 3,26,78,804

मुलचेरा - 2,08,92,913

सिरोंचा - 29,93,885

मजूर फिरवित आहेत कामाकडे पाठ :

रोजगार हमी योजनेंतर्गत वर्षभरात साधारणतः डिसेंबर ते जून या कालावधीत रोहयोच्या कामावर मजुरांची संख्या अधिक असते. मोठ्या उत्साहाने हे मजूर काम करतात. मात्र केलेल्या कामाची मजुरी मिळत नसल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील रोहयो कामावरील मजुरांची संख्या कमी झाली आहे. अनेक मजुरांनी रोहयोच्या कामाकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.

निवडणूक कामात यंत्रणा व्यस्त :

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून राज्य सरकारसह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या कामात व्यस्त आहे. रोहयो मजुरांची मजुरीच्या रकमेसाठी ओरड होत असताना कुठलीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. परिणामी मजुरांचा वाली कुणीच नाही.

वैयक्तिक कामाचेही अनुदान मिळेना :

रोजगार हमी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपात विविध बाबींचा लाभ दिला जातो. यामध्ये सिंचन विहीर, गुरांचा गोठा, मजगी, आदींचा समावेश आहे. या कामासाठीचे अनुदान मिळाले नसल्याने ही कामे अर्धवट स्थितीत रखडून पडली आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहेत