नागपूर (Nagpur) : नागपूरमध्ये झपाट्याने विकसित होत असलेल्या महामेट्रो (MahaMetro) रेल्वेने आणखी एक उंच भरारी घेण्याचा संकल्प केला आहे. याकरिता एकदोन नव्हे तर चक्क चार मजली उड्डाणपूल बांधण्यात येत असून बुटीबोरीच्या एमआयडी (MIDC) परिसरात लोखंडी पुराचे स्पेअर पार्ट तयार केले जात आहे. आशिया खंडातील प्रथमच चार मजली उड्डाण पूल असणार असल्याचा दावा कंपनीचा आहे.
हॅबटेक इंजिनिअरिंग कंपनीने चार मजली उड्डाणपूलाचे शिवधणुष्य उचलले आहे. याकरिता १ हजार ६३४ टन लोखंडाचा वापर करण्यात येत आहे. सुमारे शंभर कोटी रुपये यावर खर्च होणार असल्याचे समजते. गड्डीगोदाम रेल्वे पुलावरून मेट्रो तसेच चारचाकी वाहतूक धावणार आहे. येथे चारमजली पूल तयार होणार आहे. जमिनीवरून जड वाहतूक, त्यावर भारतीय रेल्वे धावणार आहे. त्यानंतर चारचाकी वाहतूक व त्यावर मेट्रो धावणार आहे. हा पूल पूर्णपणे लोखंडी असून बुटीबोरी येथील एमआयडीसीतील एका खासगी कंपनीमध्ये पुलाचे ट्रायल असेंब्लिंग (पूल उभा करण्याचे प्रात्यक्षिक) सुरु आहे. कंपनीच्या परिसरात जमिनीपासून २४ मीटर उंच, ८० मीटर लांब व १८ मीटर रुंद लोखंडाचा ढाचा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, गड्डीगोदाम येथील या चारमजली पुलाचे कामाचे डिझाईन बदलविण्यात आले आहे. त्यामुळे नव्या डिझाईनचा हा पूल शहरासाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.
२४ मीटर उंचावरून धावणार मेट्रो
गड्डीगोदाम येथे महिनाभरात चारमजली पुलाचा ढाचा दोन पिलरवर बसविण्यात येईल. जमिनीपासून २४ मीटर उंचावर मेट्रो ट्रॅक राहणार आहे. त्याखाली, अर्थात जमिनीपासून १४ मीटर उंचावर चारचाकी, दुचाकीसाठी रस्ता, त्याखाली भारतीय रेल्वेचे ट्रॅक राहणार असून जमिनीवरून जड वाहतूक धावणार आहे.
पाऊण लाख नटबोल्टचा वापर
चारमजली पुलाचा ढाचा जोडण्यासाठी ७८ हजार बोल्टचा वापर करण्यात आला आहे. या बोल्टला ‘हाय स्ट्रेन्थ फ्रिक्शन ग्रीप’ असेही म्हटले जाते.
१०० वर्षे आयुष्य
या लोखंडी पुलाचे आयुष्य शंभर वर्षे असेल, असे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अंकित चोखानी यांनी सांगितले. गेल्या साडेतीन महिन्यांपासून १५४ कर्मचारी पुलाचे प्रत्येक सुटे भाग तयार करीत असून ५४ तज्ज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूल उभारणार असल्याचे सांगितले.