Fadnavis & Gadkari Tendernama
विदर्भ

फडणवीस, गडकरींच्या नागपुरात भर पावसात का आली पाणीबाणी?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरात नऊ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असला तरी उत्तर व पूर्व नागपुरातील २८ जलकुंभातून पाणीपुरवठा बंद आहे. कन्हान नदीमध्ये पुन्हा फ्लाय ॲश सोडण्यात आल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्र व पम्पिंग स्टेशन बंद करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Kanhan River - Nagpur Fly - Ash)

विशेष म्हणजे पर्यावरणमंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना फ्लाय ॲश नदीत सोडण्यास मनाई केली होती. तसेच, पर्यायी व्यवस्था करण्याचेही निर्देश दिले होते. फ्लाय ॲश नदी पत्रात मिसळल्याने पाण्याचा रंग संपूर्णपणे राखाडी झालेला आहे. खापरखेडा थर्मल पावर स्टेशनमधील फ्लाय ॲश कन्हान नदीमध्ये मिसळत असल्याचा दाट संशय आहे. १० जुलैला पहाटे फ्लाय ॲश पाण्यावर आढळून आली. त्यामुळे कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचे पंप लगेच बंद करण्यात आले. जेवढे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात गेले होते ते संपूर्णपणे बाहेर काढण्यात आले आणि केंद्राची देखील साफ सफाई करण्यात आली. परंतु फ्लाय ॲश दररोज नदीच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात वाहून येत आहे.

फ्लाय ॲश हानिकारक असून, पाण्यातून घरांपर्यंत पोहोचून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारंवार कन्हान जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात येत आहे. परिणामी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. पुढील आणखी काही दिवस उत्तर व पूर्व नागपुरातील आशीनगर, नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज झोनमधील २८ जलकुंभांतून पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. याबाबत आज ओसीडब्लू, महापालिका, खापरखेडा औष्णिक केंद्राच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या अधिकाऱ्यांनी आज पाहणीही केली. त्यामुळे लवकरच तोडगा निघणार आहे.

फ्लाय ॲशच्या विल्हेवाटीसाठी खापरखेडा महाऔष्णिक केंद्रातर्फे काही कंत्राटदारांची नियुक्ती केली होती. मध्यंतरी फ्लायॲशपासून विटा निर्मितीचाही प्रकल्प सुरू करण्यात आला होता. सिमेंटमध्ये भेसळ करण्यासाठीही याचा मोठ्‍या प्रमाणात वापर केला जात होता. मात्र आपसातील वादामुळे विल्हेवाटीची सर्वच यंत्रणा विस्कळीत झाली आहे.