भंडारा (Bhandara) : भंडारा जिल्ह्यातील जागतिक दर्जाच्या गोसेखुर्द धरणावरील जल पर्यटन प्रकल्प साकारण्यासाठी अखेर पहिल्या पट्ट्यातील कामासाठी 102 कोटी रुपयांच्या मंजुरीचे पत्र निघाले आहे. सरकारने काढलेल्या या आदेशाची प्रत मुख्यमंत्र्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मुंबईत सुपूर्द केली. यामुळे हा प्रकल्प आता लवकरच साकारला जाणार आहे.
या जल पर्यटनाकरिता लागणाऱ्या एकूण खर्चातील प्रथम टप्पा म्हणून 102 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरीचे शासन आदेश मंगळवारी भोंडेकर यांना सुपूर्द केले. यामुळे जिल्ह्याला पर्यटनाकरिता जागतिक दर्जा मिळून क्षेत्रातील हजारो हातांना रोजगार मिळणार असल्याची अपेक्षा भोंडेकर यांनी व्यक्त केली आहे. या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आदेशाची प्रत यांच्या हस्ते डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे सांगितले.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात भंडारा दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी गोसे धरणाला भेट दिली होती. या भेटीनंतर त्यांनी पर्यटन विभागात असलेल्या गोसे जल पर्यटनाच्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्याची घोषणा केली होती.
याकरिता लागणाऱ्या जलसंपदा विभागाच्या 450 एकर जागेकरिता पर्यटन विभाग आणि जलसंपदा विभागात सामंजस्य करारही करण्यात आला होता. या करारानंतर जल पर्यटनाच्या कामाला चालना मिळाली. जल पर्यटनाचे काम वेगाने पूर्णत्वास येण्यासाठी डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे भोंडेकर यांनी सांगितले.