गोंदिया (Gondia) : शिक्षण, सिंचन, उद्योग आदींच्या माध्यमातून गोंदियाचे सुपूत्र मनोहरभाई पटेल यांनी पश्चिम विदर्भाच्या विकासात मोलाचे योगदान देताना नगर परिषदेपासून ते संसद आणि विधीमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातूनही त्यांनी भरीव कार्य केले आहे. या नगर परिषदेचे सुसज्ज भवन निर्माण करण्यासाठी राज्य सरकार 30 कोटींचा निधी देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानुसार राज्य सरकार गतीने जनहिताचे कार्य करीत आहे. कृषी, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा आदींमध्ये राज्य अग्रेसर आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावांना केंद्राकडूनही मंजुरी मिळून राज्यातील विविध प्रकल्प व योजनांना गती प्राप्त झाली आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला 5 ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे ध्येय ठेवले आहे. याला प्रतिसाद देत राज्य सरकारनेही यामध्ये राज्याची 1 ट्रिलीयन डॉलर्स अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी खासदार प्रफुल पटेल यांनी प्रास्ताविकात गोंदिया-भंडारा भागात मनोहरभाई पटेल यांनी निर्माण केलेले शिक्षणाचे जाळे, तसेच कृषी, सिंचन, राजकारण आदी क्षेत्रात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला.
संसदेने नारीशक्ती वंदन विधेयक पारीत केले असून यामुळे येत्या काळात संसदेसह राज्यांच्या विधीमंडळांमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येणार आहे. या पार्श्वभूमीवर नारीशक्तीच्या सहाय्याने देशाच्या अमृत काळात ठेवण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या दिशेने विकसित भारताची वाटचाल अधिक मजबुतीने होईल, असा विश्वास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केला.
येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात स्व. मनोहरभाई पटेल यांच्या 118 व्या जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती धनखड बोलत होते. उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालक मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार प्रफुल पटेल, सुनील मेंढे, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. सी. रमेश, आमदार विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, राजू कारेमोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल आदी उपस्थित होते