नागपूर (Nagpur) : राज्यातील उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर राहावा यादृष्टीने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठी राज्यसरकार पायाभूत सुविधांवर भर देत आहे. एक दूरदृष्टी घेऊन काम उभे केले जात आहे. या बळावरच महाराष्ट्र राज्य भारतात आघाडीवर आणले. मध्यंतरी हे लयाला गेलेले वैभव पुन्हा राज्याला प्राप्त करुन दिले असून परकीय थेट गुंतवणुकीतील 45 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी दूरदृष्टी ठेवून राज्यातील अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देत महाराष्ट्र शासन वाटचाल करीत आहे. कृषी क्षेत्रासह शेतकऱ्यांचेही आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने अन्नप्रक्रिया उद्योग महत्त्वाचे असून बुटीबोरी येथे 88 एकर क्षेत्रावर साकारणारा पेर्नोड रिकार्ड इंडिया डिस्टिलरी प्रकल्प महत्त्वाचा आहे. सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा गुंतवणुकीतून हा प्रकल्प रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणारा ठरेल. तसेच कमितकमी 800 युवकांना येथून रोजगार मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
राज्याच्या विकासासाठी सात क्षेत्र निवडली आहेत. यात कृषीक्षेत्र, स्टार्टअप, आर्टीफिशियल इंटिलीजन्स यावर आम्ही भर दिला आहे. नागपूर येथे आर्टीफिशियल इंटिलीजन्सचे सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यासाठी गुगलसमवेत काम सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन व पेर्नोड रिकार्ड यांच्यात हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, पेर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ जीन टुबूल, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, प्रसन्न मोहिले आदी मान्यवर उपस्थित होते.