Amravati ZP Tendernama
विदर्भ

Amravati : आचारसंहितेमुळे 54 कोटींच्या कामांना फटका; टेंडर प्रक्रियेत अडकली कामे

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेतील 40 कोटींच्या कामांना फटका बसला आहे. कारण ही सर्व कामे टेंडर प्रक्रियेत अडकली आहेत. याशिवाय टंचाई निवारणार्थ कृती आराखड्यातील 13 कोटींची कामे देखील खोळंबली आहेत. त्यामुळे आता या सर्व कामांना आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा लागली आहे. राज्यात पाच टप्प्यांत निवडणुका होत आहेत. यात राज्यातील शेवटचा टप्पा हा 20 मे पर्यंत संपणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. तेव्हापासून आदर्श आचारसंहिता अमलात आली. आचासंहितेमुळे विकासकामे ज्या स्थितीत होती त्याच स्थितीत थांबली. परिणामी जिल्हा परिषदेचे 2023-24 मधील 40 कोटी 86 लाखांची 163 कामे रखडली आहेत. याशिवाय पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यातील 13 कोटी 57 लाख रुपयांची 144 कामे देखील टेंडर प्रक्रियेत अडकली आहेत. यामुळे सुमारे 54 कोटी 53 लाखांची कामे आचारसंहितेमुळे पेंडिंग आहेत. 26 एप्रिल रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडली; मात्र मतमोजणी ही 4 जून रोजी होणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस निवडणूक प्रक्रिया कायम राहणार आहे. मतदान आटोपल्याने आचारसंहिता शिथिल होण्याची अपेक्षा आता स्थानिक स्वराज्य संस्थांना लागली आहे; मात्र आचारसंहिता शिथिल होईल की निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर कायम राहील याबाबतचे चित्र अस्पष्ट आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे. लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आटोपली असली, तरी आचारसंहिता शिथिल करण्याबाबत अद्याप कोणत्याच सूचना प्राप्त नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठ्याची कामे करण्यासाठी सीईओ, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे. अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता  सुनील जाधव यांनी दिली.