Hospital Tendernama
विदर्भ

Nagpur : 47 कोटीसाठी 5 वर्षांपासून प्रलंबित आहे जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मानकापूर येथे प्रस्तावित जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण करण्याची मुदत होती पण 5 वर्षे लोटूनही रुग्णालयाचे काम पूर्ण झाले नाही. सध्या 100 खाटांच्या जुन्या रुग्णालयाचे काम करणे अपेक्षित होते पण निधीअभावी ते कामही ठप्प पडले आहे. या कामासाठी 3 कोटी रुपयांची गरज होती. त्यानंतर येथे फायर सेफ्टी, मॉड्यूलर ओटी, रॅम्प व शवविच्छेदनगृहाच्या कामासाठी 44 कोटी रुपयांचा संशोधित प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला. मात्र हा निधीसुद्धा अद्याप प्राप्त झाला नाही.

विशेष म्हणजे नागपुरात जिल्हा रुग्णालय बनविण्याची तयारी 2012-13 पासून सुरू आहे. मनोरुग्णालय व मानकापूर क्रीडा संकुल यामधील जागा निर्धारित करण्यात आली. या प्रस्तावाला 2016 मध्ये मंजुरी मिळाली. यानंतर 16 कोटी रुपये खर्च असलेल्या 100 खाटांच्या रुग्णालयाचे काम 2 मे 2018 पासून सुरू करण्यात आले. 24 महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र 5 वर्षे होऊनही रुग्णालयाचे बांधकाम अपूर्ण आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ 10-15 झोपड्यांचे अतिक्रमण गेल्या 5 वर्षांपासून हटविण्यात आले नाही, ज्यामुळे सुरक्षा भिंतीचे बांधकाम होऊ शकले नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून येथील काम थांबले असून कंत्राटदार कंपनीचे माणसेही दिसत नाही. कोरोना काळात मैदाने आणि रेल्वेच्या बोगीमध्ये अस्थायी रुग्णालय उभारावे लागले होते. मात्र आता परिस्थिती बदलली आणि रुग्णालयाचे महत्त्व कमी झाले आहे.

दूरदृष्टीचा अभाव

2012 नुसार येथे 100 खाटांच्या रुग्णालयासाठी जी प्लस-2 इमारत बनविण्यात येत आहे. या इमारतीचे पिल्लर जास्त मजली इमारतीसाठी नाहीत. त्यामुळे भविष्यात या इमारतीवर जास्त मजले बांधता येणार नाहीत. सध्या अतिरिक्त 400 खाटांचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. अतिरिक्त खाटांसाठी परिसरात दुसऱ्या ठिकाणी इमारत बांधावी लागेल. आरोग्यासारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणीची गती संथ असल्याने सरकारी काम दिशाहीन पद्धतीने चालढकल करीत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

एनएचएआय बनविणार नेत्र रुग्णालय

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) नेत्र रुग्णालयाची उभारणी करीत आहे. 40 खाटांच्या या रुग्णालयाचे बांधकाम मानकापूर येथील जिल्हा रुग्णालय परिसरात करण्यात येणार आहे. इंदोरा चौक ते दिघोरीपर्यंत बनणाऱ्या उड्डाणपुलाला (8.90 किमी) डागा हॉस्पिटलजवळ पुलावरून प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी जोड रस्ता देण्यात येणार आहे. याकरिता डागा हॉस्पिटलची जागा अधिग्रहित करण्यात येईल. जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डॉ. निवृत्ती राठोड म्हणाले, डागाच्या जमिनीच्या मोबदल्यात एनएचएआय मानकापूर येथील निर्माणाधीन जिल्हा रुग्णालय परिसरात नेत्र रुग्णालयाची उभारणी करणार आहे.