Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना का दिली ताकीद?

टेंडरनामा ब्युरो

गडचिरोली (Gadchiroli) : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडेश्वर देवस्थानच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी निधीची कमतरता नाही. मात्र, पुरातत्व विभागाचे काम मंद गतीने सुरू आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. काम अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याने भाविकांना रोष आहे. मात्र, आता हे काम जलदगतीने पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

चामोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र मार्कंडा येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी 4 फेब्रुवारीला भेट दिली. हेमाडपंथी बांधकाम व शिल्पकलेचा अद्भूत नमुना असलेल्या या मंदिरावरील प्रत्येक शिल्पकृतीची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. नागपूर ग्रामीणचे उपनिरीक्षक व शिल्पकला अभ्यासक प्रविण योगी यांनी त्यांना तपशीलवार माहिती दिली. यानंतर त्यांनी मंदिरात दर्शन घेतले व महापुजा केली. त्यानंतर त्यांनी मंदिराच्या सभागृहात मार्कंडा देवस्थानच्या विकासाकरिता एमएमआरडीसीच्या माध्यमातून मंजूर 100 कोटी रुपये व पुरातत्व विभागाच्या 5 कोटी रुपयांच्या प्रलंबित विकासकामांचा आढावा घेतला.

खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, नक्षलविरोधी अभियानचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांची उपस्थिती होती.

दरम्यान, आढावा बैठकीपुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुरातत्व विभागाच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. मार्कंडा देवस्थान हे ऐतिहासिक व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाण आहे, हे वैभव टिकले पाहिजे, याकरिता मंत्र्यांशी बोलून जीर्णोद्धाराच्या कामाला गती कशी देता येईल, यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना दिली ताकीद :

मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण व्हायला किती दिवस लागतील, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, त्यावर पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक यांनी दीड वर्षे लागतील, असे उत्तर दिले. यावर आमदार डॉ. होळी यांनी नाराजी व्यक्त्त केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी काम विनाविलंब झाले पाहिजे, अशी ताकीद दिली.

पुरातत्व विभागाने मंदिर व संपूर्ण परिसर संरक्षित केलेला आहे. जीर्णोद्धाराच्या कामामुळे महाशिवरात्री व इतर उत्सवावेळी भाविकांना मंदिर परिसरात प्रसाद वाटपावरही निबंध आणल्याची तक्रार पुजाऱ्यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीर्णोद्धार करताना प्रथा, परंपरा थांबविता येणार नाहीत.

महाशिवरात्री व महत्त्वाच्या उत्सवावेळी प्रथेप्रमाणे मंदिरातच भाविकांना प्रसादाचे वाटप करा, असे आदेश दिले. यासंदर्भात काही अडचण भासल्यास थेट मला संपर्क करा, अशा शब्दांत त्यांनी पुजाऱ्यांना आश्वासित केले.