Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

Devendra Fadnavis : आष्टीच्या क्रांतिस्थळाला स्फूर्तिस्थळाचा दर्जा; 150 कोटींचा आराखडा

टेंडरनामा ब्युरो

वर्धा (Wardha) : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 1942 ला झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात आष्टीचे मोलाचे योगदान राहिले आहे. या लढ्यात 6 शूरवीरांनी हौतात्म्य पत्करल्याने या लढ्याची इतिहासात नोंद झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उपेक्षित असलेल्या क्रांतिस्थळाला स्फूर्तिस्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी अनेक वर्षांपासून शासनदरबारी लढा सुरू होता. अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कार्यासन अधिकारी सुमित वानखेडे यांनी शहीद भूमीतील हा आवाज शासन दरबारी पोहोचविल्याने या क्रांतिस्थळाला स्फूर्तिस्थळाचा दर्जा बहाल करण्यात आला. तसेच विकासाकरिता पहिल्या टप्प्यात दीडशे कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

या स्वातंत्र्य लढ्यावर लघुचित्रपट तयार करण्यात आला. हा चित्रपट लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद या सर्व ठिकाणी प्रदर्शित करून हुतात्मा स्मारक समिती आष्टीच्या वतीने या क्रांतिस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, ही मागणी रेटून धरण्यात आली. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, खासदार रामदास तडस यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले होते.

त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहीद भूमीला 5 कोटींचा निधी दिला होता. त्यामध्ये 2 कोटी क्रांतिस्थळाच्या विकासासाठी तर 3 कोटी शहीद भूमीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी खर्च करण्याची अट होती. स्मारकासाठी असणारा 2 कोटी निधी तांत्रिक बाबीअभावी शासन दरबारी पडून राहिला.

देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे कार्यासन अधिकारी आर्वीचे भूमिपुत्र सुमित वानखडे यांच्याकडे हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष भरत वणझारा यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी स्फूर्तिस्थळाचा दर्जा मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू केला. 

आमदार दादाराव केचे यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधीसुद्धा लावली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये क्रांतिस्थळाला स्फूर्तिस्थळाचा दर्जा बहाल केला. या स्फूर्तिस्थळाचा विकास करण्यासाठी तत्काळ आराखडा सादर करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. संयुक्त बैठक घेऊन आराखडा तयार करण्याची जबाबदारी उपविभागीय अभियंता महेश मोकलकर यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी लागलीच पहिल्या टप्प्यात 150 कोटींचा विकास आराखडा तयार केला. हा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर झाला असून जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री देवेंद्र फडणवीस मंजुरी प्रदान करतील.

हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयामध्ये मी शिक्षण घेतले. हे विद्यालय क्रांतिस्थळाच्या वास्तूमध्ये आजही कार्यरत आहे. या क्रांतिस्थळाला स्फूर्तिस्थळाचा दर्जा मिळावा म्हणून मी गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठविला. राज्य शासनाने स्फूर्तीस्थळाचा दर्जा बहाल केला. आता विकास आराखडा पूर्णत्वास जाईल. शहीद भूमीला हा दर्जा मिळवून दिल्याने मला समाधान झाले, अशी प्रतिक्रिया आर्वी चे आमदार दादाराव केचे ने दिली.

दीडशे कोटींचा आराखडा

सेवाग्राम विकास आराखड्याच्या धर्तीवर स्फूर्तिस्थळाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये सद्यःस्थितीत स्वातंत्र्यलढ्याच्या ठिकाणी असलेल्या हुतात्मा राष्ट्रीय कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाची अप्पर वर्धाच्या वसाहतीत जागा अधिग्रहित करून इमारत बांधून देणार आहे. त्यानंतर या क्रांतिस्थळाच्या आजूबाजूची सर्व जागा अधिग्रहित करून विकसित केली जाणार आहे. मागील बाजूची पशुसंवर्धन विभागाची जागाही अधिग्रहित करण्यात येणार आहे.

आष्टी शहरामधील सर्व अंतर्गत रस्ते, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कपिलेश्वर देवस्थान, टेकडीवाले बाबा दर्गा, टिपरीवाले बाबा देवस्थान, आष्टी तलाव, शहीद झालेल्या शूरवीरांना अंतिम संस्कार केलेले ठिकाण, शासकीय शहीद स्मारक, गावातील प्रमुख चौकामधील शहिदांचे पुतळे उभारणे, क्रांतिस्थळाच्या ठिकाणी भव्यदिव्य बांधकाम करण्यात येणार आहे.

1942 च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेल्या शूरवीरांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या म्हणून शासनाकडे क्रांतिस्थळाला स्फूर्तिस्थळाचा दर्जा मिळण्याकरिता केलेल्या पाठपुराव्याला यश आले. आता दीडशे कोटींचा आराखडा तयार झाला असून हा आराखडा लवकरच अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करून निधीची तरतूद केली जाईल. त्यानंतर पुढील कामाला सुरुवात होईल. हे सुरू केलेले मिशन पूर्ण होईपर्यंत कुठेही खंड पडणार नाही. यासाठी मी शेवटपर्यंत लक्ष ठेवून आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांचे कार्यासन अधिकारी सुमित वानखडे यांनी दिली.