Nagpur Vidhanbhavan Tendernama
विदर्भ

Devendra Fadnavis : 'या' उपसा सिंचन योजनेला राज्य सरकार देणार 850 कोटी

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला एक महिन्याच्या आत 850 कोटी रुपयाची फेर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत दिली.

नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेस तापी पाटबंधारे विकास महामंडळाने 1999 अन्वये 110.10 कोटी रुपयांच्या किमतीस मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या योजनेचे 2013 पर्यंत काम सुरू झालेले नव्हते, मध्यंतरी काम सुरू झाले. प्रकाशा बुराई उपसा जलसिंचन योजनेबाबत सदस्य जयकुमार रावल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

2019 मध्ये या सिंचन योजनेला फेर प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला, मात्र तेव्हा प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. आता पुन्हा फेर प्रशासकीय मान्यतेची फाईल सुरू करण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

या उपसा योजनेअंतर्गत 4 पंप हाऊस बांधावयाचे आहेत. त्यापैकी पहिले पंप हाऊस पूर्ण झाले असून दुसऱ्या पंप हाऊसचे काम सुरू झाले आहे. फेर प्रशासकीय मान्यतेनंतर उर्वरित कामाची टेंडर काढून काम पूर्ण करण्यात येईल. तसेच अधिवेशनानंतर यासंदर्भात बैठकीचे आयोजनही करण्यात येईल. फेर प्रशासकीय मान्यतेसाठी एम. डब्ल्यू. आर. आर. ए. (महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण) ने पाणी वापराबाबत हरकत घेतली होती. त्या हरकतीची पूर्तता करण्यात आली आहे. 

सारंगखेडा बॅरेजच्या कमांड एरिया बाहेरून 1.6 टीएमसी पाणी आणण्यात येणार आहे. हे एम.डब्ल्यू.आर.ए.ए ला सांगण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रशासकीय मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य संजय सावकारे यांनी भाग घेतला.