नागपूर (Nagpur) : नोकऱ्या देण्याचा प्रयत्न सरकार करते. त्याबद्दलची माहिती सरकारकडे असते. मात्र, खाजगी आस्थापना, कंपन्यांकडे असणाऱ्या जागांची माहिती घेऊन बेरोजगारांना माहिती देणे व त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे यासाठी यापुढे रोजगार मेळावे होतील. कौशल्य विकास विभाग हा यासाठीचा प्लॅटफॉर्म बनून काम करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.
महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल...
स्टार्टअप सुरू करण्यात महाराष्ट्र अन्य राज्यांपेक्षा पुढे आहे. आऊटलूक कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार देशातील सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात सुरू झाले असून, महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल आहे. विशेषत: ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण, मार्केट लिंकेज देणारे स्टार्टअप देखील सुरू झाले आहे.
दोन दिवसात 32831 मुलाखती
नमो महारोजगार मेळाव्यात एकूण 67,378 उमेदवारांची नोंदणी झाली. यात देशातील नामांकित 552 कंपन्यांनी सहभाग नोंदविला, तर 38,511 युवक-युवतींनी सहभाग घेतला. दोन दिवसांत विविध कंपन्यांनी 32,831 मुलाखती घेतल्या असून, यापैकी 11,097 उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
माझ्या पाच मुलांचा पगारच पाच कोटीपेक्षा अधिक
नमो रोजगार मेळाव्याच्या खर्चासंदर्भात काहींना प्रश्न पडला आहे. म्हणे, पाच कोटीपेक्षा अधिक खर्च लागला. आज या ठिकाणी आम्ही पाच उमेदवारांना सहा ते दहा लाखांपेक्षा अधिक पॅकेजचे नियुक्ती पत्र दिले. या माझ्या मुलांचा पगारच ५ वर्षांत ५ कोटींपेक्षा अधिक होईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नागपूरचा हा नमो रोजगार मेळाव्याचा प्रयोग यशस्वी झाला असून, अन्य विभागात व जिल्ह्यातही हे मेळावे घेण्यात येईल.