नागपूर (Nagpur) : आजपर्यंत देशात अनेक राज्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मात्र महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळावा हा देशात अभुतपूर्व ठरला आहे. दोन दिवसीय या मेळाव्यात 67 हजार 378 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 11097 उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नोंदणी झालेल्या उर्वरीत सर्व उमेदवारांच्या नोकरीसाठी शासन पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
नागपूर येथील नमो महारोजगार मेळाव्यात उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी सहभाह नोंदवून एक विक्रम केला आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात सर्वाधिक रोजगार देणारा हा मेळावा ठरला आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाने विशेष पुढाकार घेतला असून, सर्वांच्या मेहनतीने आणि समन्वयातून हा मेळावा यशस्वी ठरला आहे. मुलाखतीच्या माध्यमातून काही लोकांना प्रतिवर्ष 10 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले असून, ही नमो महारोजगार मेळाव्याची फार मोठी उपलब्धी आहे. विशेष म्हणजे विविध कंपन्यामध्ये रोजगार मिळालेल्या 11097 उमेदवारांना नाविन्यपूर्ण कल्पनेतून एकाच क्लिकद्वारे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
फडणवीस म्हणाले की, आजही उद्योगांना मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे उद्योग कंपन्यांना मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी शासन दुवा म्हणून काम करेल. दोन दिवसीय या मेळाव्यात कॉउंटर बंद झाल्यावर सुध्दा नोंदणी सुरूच होती. या नोंदणीच्या माध्यमातून कंपन्यांकडे उमेदवारांची माहिती जमा झाली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना बायोडाटाच्या आधारावर कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पाठपुरावा करावा.
ज्यांना आज नियुक्तीपत्र मिळाले आहे, त्यांनी आपली गुणवत्ता सिध्द करून प्रमोशन घ्यावे, तर ज्यांना आजच्या मेळाव्यात नोकरी मिळाली नाही, अशा उमेदवारांसाठी सरकारतर्फे आस्थापनांकडे पाठपुरावा सुरूच राहील, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी रिलायन्स, टाटा व अन्य काही आस्थापनांच्या सहभागासाठी सन्मान केला. नागपूरमध्ये मोठ्या संख्येने कंपन्या आल्याबद्दल आभार मानले.
दोन दिवसांत घडला इतिहास
नागपूर येथील नमो महारोजगार मेळावा हा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला असून, मेळाव्यामध्ये सहभागी कंपन्या आणि मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता या दोन दिवसांत एक नवीन इतिहास नागपूरने घडविला, असे गौरवोद्गार कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले.