Mid Day Meal Tendernama
विदर्भ

Deepak Kesarkar : पोषण आहार पुरवठ्यासाठीची 'ती' प्रक्रिया शहरातही राबविणार

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा ठेकेदारांकडून होत नाही. हा पुरवठा संस्थेच्या माध्यमातून केला जातो. ग्रामीण भागात धान्य आणि वस्तू तपासून पाठवताना जी प्रक्रिया राबविली जाते तीच प्रक्रिया शहरी भागासाठीही राबविली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरात दिली.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोषण आहारातील वस्तू तपासून पाठवल्या जातात. ज्या ठिकाणी मध्यवर्ती किचन आहे त्या ठिकाणी शिजवलेले अन्न तपासले जाते, त्याचा दर्जा राखण्यासाठी संबंधितांना प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत राज्यातील 25 जिल्ह्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असून वर्षअखेर पर्यंत उर्वरित दहा जिल्ह्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोषण आहार दर्जेदार आणि रुचकर असावा यासाठी समिती तयार करण्यात येणार असून त्याच्या पाककृती ठरविण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात महिनाअखेर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात मुलांना आठवड्यातून एकदा अंडी आणि केळी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हानिहाय बिंदूनामावली अंतिम करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना पसंती क्रमांक देण्यास सांगितले जाईल. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.

राज्यात 3 ते 18 वर्षे वयोगटातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात 'शाळेत चला अभियान' राबविण्यात येईल, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

केसरकर म्हणाले की, 17 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राज्यात 1624 मुले व 1590 मुली असे एकूण 3214 बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. या सर्वेक्षणानुसार संपूर्ण मुंबईत एकूण 356 बालके शाळाबाह्य आढळून आले असून ही सर्व 356 बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत.

ठाणे जिल्ह्यात 380 बालके शाळाबाह्य आढळून आले असून त्यापैकी 297 बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत, रायगडमध्ये 38 बालके शाळाबाह्य आढळून आले असून ती सर्व बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. तर पालघर मध्ये 928 बालके शाळाबाह्य आढळून आले. 

सर्वेक्षणाच्या कालावधी मध्ये 71 बालके व सर्वेक्षणाच्या कालावधी नंतर 94 अशी एकूण 165 बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. उर्वरीत 763 बालकांना देखील नजीकच्या शाळेत दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

राज्यात विशेषत: पालघर, ठाणे आणि बुलडाणा या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले जाईल. शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण आणि नगरविकास विभागाच्या समन्वयातून शाळांची दुरुस्ती, शाळेतील विद्यार्थी संख्येत वाढ आदी बाबींवर लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.