Nagpur Tendernama
विदर्भ

पाच शेळ्या पळवल्या कोणी? नागपूर झेडपीत आणखी एक घोटाळा

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर जिल्हा परिषदेच्या (Nagpur Z P) पशुसंवर्धन विभागातील (Animal Husbandry Department) घोटाळे संपता-संपत नाहीत, अशी परिस्थिती आहे. जिल्हा परिषद विशेष घटक योजनेतून ४५ हजारांत १० शेळ्या व एक बोकड देण्याची योजना आहे. परंतु, एका लाभार्थ्याला १० शेळ्या व एक बोकडाचे बिल देऊन केवळ पाच शेळ्या व एक बोकड देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात भोंगळ कारभार सुरू आहे. या विभागाला पूर्णवेळ अधिकारीही नाही. शेळी गट व गाय गट वाटपात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पी सभेत विरोधकांसह सत्ताधारी सदस्यही आक्रमक झाले होते. त्यामुळे सभाच आटोपती घ्यावी लागली होती. आता विशेष घटक योजनेअंतर्गत शेळी-मेंढी वाटपातही गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर येथून राजहंस वासनिक (रा. अडेगाव, पो. कोडामेंढी, ता. मौदा) या लाभार्थ्याने २६ मार्च रोजी बकऱ्या घेतल्या. लाभार्थ्याला १० शेळ्या व एक बोकड मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्याला पाच शेळ्या व एक बोकड दिले. मात्र बिल १० शेळ्या, एक बोकड आहे. याशिवाय दुसरा लाभार्थी विनोद बावनगडे याचाही समावेश आहे. विभागातील अधिकारी बोलण्‍यात तयार नाही. परिणामी, यात मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

या योजनात १० शेळ्या, एक बोकड मिळतो. परंतु आता दर वाढल्यामुळे त्यांना वजनानुसार शेळ्या व बोकड देण्यात येत आहे. लाभार्थी वजनदार शेळ्या-बोकड घेतात. या योजनेला कंत्राटदार न मिळाल्याने लाभार्थ्यांना खुल्या बाजारातून खरेदी करण्याचा पर्याय ठेवला होता. त्यानुसार वितरण केले जात आहे. लाभार्थ्याने शेळ्या खरेदी करून घरी का नेल्या? सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी लाभार्थ्यांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो.

- तापेश्वर वैद्य, सभापती, कृषी व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद नागपूर

बिल १० शेळ्यांचे असताना ५ शेळ्या लाभार्थ्याला दिल्या कशा? विशेष घटक योजनेत मोठा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी झाली पाहिजे.

- राधा अग्रवाल, सदस्या, जिल्हा परिषद नागपूर