नागपूर (Nagpur) : मेडाकडून काढण्यात आलेल्या टेंडरला अखेर कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ५६४ शाळांमध्ये सौर प्रकाश पडण्याची आशा निर्माण झाली आहे.
जि. प. च्या शंभर टक्क शाळा सौर ऊर्जेवर प्रकाशावर आणण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात डीपीसीतून २८७ शाळांकरिता ४.२८ कोटीचा निधीही महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीला (मेडा) वळता केला होता. या निधीतून मेडाने शाळांमध्ये हे काम पूर्णही केले. यानंतर खनिज प्रतिष्ठानकडून याच सौर पॅनलच्या कामासाठी ७.१८ कोटीचा निधी जि. प. ला मंजूर झाला. यातून आणखी ७२० शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार होते. यापैकी जवळपास ४० टक्के म्हणजेच २.९२ कोटी ७२ लाख रुपयाचा खनिज निधी जि. प. कडे दीड वर्षांहून अधिक काळापूर्वी वळताही झाला.
विशेष म्हणजे हा निधी वळता करण्यास काही पदाधिकारी व सदस्यांच्या आग्रहामुळे विलंब झाला. परिणामी सौर पॅनलच्या साहित्याचे दरवाढ झाली. त्यामुळे मेडा, पुणे कार्यालयाने ५६४ शाळांच्या कामासाठी चार ते पाचदा टेंडर काढूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मार्च २०२२ मध्ये पुन्हा एकदा मेडाने टेंडर काढल्यात. त्यामध्ये मेडाने काही अटी व शर्ती शिथिल केल्या. सूत्रांच्या माहितीनुसार त्यामध्ये टेंडरमध्ये सहभागी होणाऱ्या कंत्राटदारांची वार्षिक उलाढालीमध्ये घट करण्यात आली होती. यानंतर या टेंडरमध्ये काही कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला. नुकतेच ते टेंडरही उघडण्यात आल्याची माहिती असून, कंत्राटदारास लवकरच कार्यादेश दिल्या जाणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये सौर प्रकाश येण्याचा मार्ग मोकळा झाला.