Nagpur Tendernama
विदर्भ

कंत्राटदार कंपनीचा अजब कारभार; १४ कोटी खर्च करूनही

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : शहरातील ऐतिहासिक तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या नावावर पैशाची उधळपट्टी करण्यात आल्याचे पांढराबोडी तलावाच्या स्थितीवरून स्पष्ट दिसून आले. आता सौंदर्यीकरणाचे काम सुरू असलेल्या गांधीसागर तलावात परिसरातील सांडपाणी येत असल्याने महापालिका तलावांबाबत नागपूरकरांची फसवणूक तर करीत नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गांधीसागर तलावाचे खोलीकरणाचे काम सुरू आहे. मध्य नागपुरातील या तलावाभोवती पर्यटकांची गर्दी वाढावी, यासाठी सौंदर्यीकरणाचे काम महापालिकेने सुरू केले. सौंदर्यीकरणाचे काम करताना काही बाबी प्रस्तावित होत्या. त्याकडे आतापासूनच दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गांधीसागर तलावातील सर्व पाणी काढून खोलीकरण्यात येत आहे. परंतु एकीकडे पाणी काढले असतानाच दुसरीकडे झुलेलाल मंदिर मागील भागातून तलावात सांडपाणी सोडले जात आहे. या तलावात घाण पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. परंतु अजूनही तलावात सांडपाणी जमा होत असल्याने सौंदर्यीकरणाचा हा कुठला प्रकार आहे, असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे.

सौंदर्यीकरणाच्या कामाच्या सुरुवातीलाच कंत्राटदार कंपनीचा बेजबाबदारपणा पुढे आला. परंतु महापालिका धंतोली झोनचे अधिकारीही झोपेत दिसून येत आहे. या कामादरम्यान अधिकारी फिरकूनही पाहात नसल्याने कंत्राटदार कंपनी सोयीस्कररित्या काही बाबींना बगल देत असल्याचे दिसून येत आहे. आताच सांडपाणी बंद केल्यास भविष्यात तलावात ते शिरणार नाही, असे गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांनी सांगितले. याशिवाय या कंपनीचे काम कोण कंत्राटदार करीत आहे? प्रकल्पाची किंमत किती? कधी पूर्ण होणार? याबाबत कुठलाही फलक लावला नसल्याचेही त्यांनी नमुद केले. तलावाला लागून असलेल्या हुतात्मा स्मारकाची दुर्दशा झाली असून दुरुस्ती व रंगरंगोटी करण्याची मागणीही त्यांंनी केली. या तलावाच्या सर्वच बाजूचे सौंदर्यीकरण प्रस्तावित आहे. पायी चालण्यासाठी ट्रॅक, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था असेल. तलावाच्या मध्यभागी आकर्षक कारंजे बसविण्यात येणार आहे. अम्यूजमेंटसाठी बालभवनलगत मोठी इमारत बांधण्यात येणार आहे. तलावाच्या मध्यभागी असलेल्या भाऊजी पागे उद्यानापर्यंत जाण्याकरीता एक पूल बांधण्याचेही प्रस्तावित आहे.

राज्य सरकारकडून १२ कोटी
तलावाच्या विकास व सौंदर्यीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून १२ कोटी रुपये मिळाले आहे. याशिवाय महापालिकेनेही २ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद केली आहे. गांधीसागर तलाव हेरिटेज असून त्यानुसार त्याचा विकास करण्यात येत आहे. परंतु सांडपाणी कायम राहील्यास हा पैसा सांडपाण्यात तर जाणार नाही ना, असा प्रश्न गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेने उपस्थित केला आहे.