bridge Tendernama
विदर्भ

Buldhana : 'या' नदीवरील पुलाचे निकृष्ट काम उघड; अवघ्या बारा महिन्यांतच दिसू लागल्या सळया

टेंडरनामा ब्युरो

बुलढाणा (Buldhana) : साखरखेर्डा ते लव्हाळा रस्त्यावरील कोराडी नदीच्या पुलावरील लोखंडी सळ्या उघड्या पडल्याने बारा महिन्यांतच या पुलाच्या कामाची वाट लागली आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

साखरखेर्डा ते लव्हाळा रस्त्यावरील भोगावती, कोराडी आणि एका नाल्यावरील पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सात कोटी रुपये मंजूर केले होते. कामाची सुरुवात ढिसाळ पद्धतीने करण्यात आली होती. या रस्त्यावर अनेक सामाजिक सामाजिक कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला होता. परंतु काम होणे आवश्यक असल्याने या कामात दिरंगाई होऊ नये, म्हणून बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहून कामाचा दर्जा तपासून घेण्याचे सुचवले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी कामाच्या चाचणीची तपासणी न करता कामाला सुरुवात केली. भोगावती नदीवरील पुलाचे काम थातूरमातूर करून कठड्याचे काम तसेच बाकी ठेवले. पुलाचे काम पूर्ण होऊन 12 महिने होत नाही तोच पुलावरील टाकलेला भराव उखडून लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत.

रात्रीच्या वेळी दुचाकीमध्ये लोखंडी सळ्या अडकून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पण याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे अजूनही दुर्लक्ष आहे. या संबंधित काम करणाऱ्या मयूर बिडवे या कंत्राटदाराला विचारले असता, पहिले तर त्याने उडवा उडवी ची उत्तरे दिली, नंतर कार्यवाही होणार या भितिने दोन दिवसात कामगार पाठवून येथील दुरुस्ती केली जाईल. तसेच उर्वरीत कामही लवकर मार्गी लावण्यास प्राधान्य देवू असे सांगितले.