Wardha Tendernama
विदर्भ

हे काय? दोन वर्षातच नवा पूल मध्येच वाकला; पुलाच्या निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी

टेंडरनामा ब्युरो

वर्धा (Wardha) : गेल्या 18 दिवसांत बिहार राज्यात सुमारे 12 पूल कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत वर्धा नदीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन बेलोरा पुलाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. घुग्घूस ते वणी मार्गाला जोडणारा पुल जूना झाल्याने नवीन पुल बनवायचे होते. म्हणून 10 जुलै 2018 रोजी महामार्गाला जोडणाऱ्या जुन्या वर्धा नदीच्या पुलाचे काम सुरु करण्यात आले. 24 कोटी 69 लाख रुपयांच्या अंदाजे निधीतून पुलाचे बांधकाम 9 जानेवारी 2020 पर्यंत अठरा महिन्यांत पूर्ण करायचे होते.

नवीन पुलाच्या कामाचे कंत्राट पुण्याच्या मे. एम. बी. घारपुरे इंजीनियर्स व कंत्राटदाराला दिले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे या पुलाचे मुख्य पिलर व पुल मध्यभागी झुकले आहेत. पुलाच्या अश्या अवस्थेत जर वाहतूक सुरु असली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. या पुलाच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. बेलोरा पुलिया संकुलातील नवीन पुलाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली. दरम्यान, उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त दंडाधिकारी पवार यांनी अभियंत्यामार्फत कल्व्हर्टची चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

मात्र, कोट्यवधींचा निधी खर्च करून निकृष्ट दर्जाचे काम करून पैसे खाणाऱ्या अश्या ठेकेदारावर गंभीर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच संबंधित अभियंताने सुद्धा आपल्या जवळच्या ठेकेदाराला काम दिले व पैसे खाल्ले असाही आरोप नागरिक करीत आहे. अश्या अभियंतावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.