road Tendernama
विदर्भ

Nagpur : 'या' पुलाच्या खड्ड्यांचा निषेध करत नागरिकांना वाटले चक्क 'झंडू बाम'

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : पाचपावली रेल्वे ओव्हरब्रिजवरील  मोठमोठ्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी खराब रस्ता, खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागरी सेल च्या नेतृत्वात निदर्शने केली. वर्षानुवर्षे दुरुस्त न झालेल्या रस्त्यांची भीषण अवस्था अधोरेखित करण्यासाठी लोकांनी ये-जा करणाऱ्यांना झंडू बाम वाटले.

गेल्या दोन वर्षांपासून प्रशासन विकासकामांच्या नावाखाली शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. यासोबतच शहरातून बाहेर जाणाऱ्या बायपास व इतर रस्त्यांचे काम सुरू आहे, मात्र पाचपावली पुलावरील खड्डय़ांकडे प्रशासन डोळेझाक करत असून येथे रोजच अपघात होत आहेत.

अधिकाऱ्यांना वाटले झंडू बाम

विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात प्रचंड रोष आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे शहरातील सर्व सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून प्रत्येक रस्त्याला मोठमोठे भेगा पडल्याने जणू भूकंपच झाला आहे. यामुळे संबंधित कंत्राटदारांच्या कामाचा दर्जा उघड होतो आणि निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांकडे डोळेझाक करणारे पीडब्ल्यूडी अभियंते आणि जेई यांची कंत्राटदारांशी आर्थिक संगनमत होते, असा दावा एनसीपी कार्यकर्ताकडून केला आहे.

पाचपावली आरओबी हा उत्तर नागपुर आणि मध्य नागपूरच्या प्रमुख बाजारपेठेला जोडणारा ट्रान्सपोर्ट पूल आहे आणि सध्या तो जीर्ण अवस्थेत आहे. खड्ड्यांमुळे अनेक अपघात नागरिकांचे होत असून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना पाठदुखीचा त्रास होत आहे. या आंदोलनात नागरिकांना पाठदुखीवर उपचार म्हणून झंडू बाम वाटप करण्यात आले.यावेळी या रस्त्यावरील खड्डे सात दिवसात दुरुस्त न केल्यास रास्ता रोको करून जनआंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरी सेल अध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.  यावेळी  मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी  व्यापारी वर्गातील नागरिक उपस्थित होते.