Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : रस्त्याचे सोडून नाल्याचे काम करीत आहे 'ही' कंत्राटी कंपनी; नागरिकांना त्रास

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : कावरापेठ ते तुकाराम नगर असा बांधण्यात येणारा उड्डाणपूल पूर्व आणि उत्तर नागपूर मतदारसंघासाठी मैलाचा दगड ठरू शकतो. शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या उड्डाणपुलामुळे शांतीनगर ते कामठीपर्यंतची ढासळलेली वाहतूक व्यवस्था बदलणार आहे. उड्डाणपुलासोबतच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कंत्राटदाराला सर्व्हिस रोड आणि रस्त्यालगत नालेही बांधायचे आहेत. एनआयटीने येथे आधीच नाले बांधले असून त्या नाल्यांची दुरुस्ती केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारामुळे लोकांमध्ये संताप आहे.

कर्नाटकच्या कंपनीला दिले टेंडर :  

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कावरापेठ ते तुकाराम नगर असा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या बांधकामाचे कंत्राट कर्नाटकातील एका कंपनीला देण्यात आले आहे. उड्डाणपुलासाठी अनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले, मात्र अद्यापही रस्त्याचे सपाटीकरण झालेले नाही. पथदिवे हटवून सर्व्हिस रोड बांधण्याचा दावा पीडब्ल्यूडीने केला होता. महावितरण व संबंधित यंत्रणांनी पथदिवे हटवून दोन महिने झाले, तरी रस्त्याची दुर्दशा दूर झालेली नाही. नागपूर ते कामठी हा मार्ग शहराच्या मध्यभागातून जातो. हा रस्ता रहिवासी भागातून जात असल्याने येथे सतत वाहनांची वर्दळ असते.

मुख्य अभियंता यांच्याकडे तक्रार :

उड्डाणपुलासाठी रस्त्यावर मोठमोठे खड्डे केल्याने काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची तक्रार मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांना करण्यात आली होती. मुख्य अभियंता नंदनवार यांनी कार्यकारी अभियंता दिलीप देवळे यांना बोलावून खड्डे बुजवून सर्व्हिस रोड तयार करण्याचे निर्देश दिले होते. मुख्य अभियंत्यांच्या आदेशानंतरही येथे काम झाले नाही.

दोन वर्षांपासून होत आहे त्रास 

या रस्त्याच्या दुर्दशेची तक्रार मुख्य अभियंता यांच्याकडे केली होती, मात्र सुधारणा झाली नसल्याचे शहर काँग्रेस कमिटीचे सचिव गोपाल यादव यांनी सांगितले. पथदिवे काढल्यानंतरही सर्व्हिस रोड बांधण्यात आलेला नाही. जवळपास दोन वर्षांपासून हा गोंधळ सुरू आहे. गेल्या पावसात या नाल्यांतून पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. सर्व पाणी रस्त्यावर साचले होते. या जुन्या नाल्यांची दुरुस्ती ठेकेदारच करत आहे. पीडब्ल्यूडीचे अधिकारी लक्ष देत नाहीत. या मार्गावरून दररोज दोन लाखांहून अधिक लोक प्रवास करतात. येथून वाहन चालवणे हे आव्हान बनले आहे.

तुम्हाला सोय हवी असेल तर त्रास सहन करा :

कार्यकारी अभियंता दिलीप देवळे म्हणाले की, उड्डाणपूल बांधल्यानंतर नागरिकांना सुरळीत वाहतुकीचा लाभ मिळणार आहे. सोय हवी असेल तर त्रासाला सामोरे जावे लागेल. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व्हिस रोड बांधण्यात येणार आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी दर्जेदार नाले बांधण्याची मागणी करण्यात येणार आहे. एनआयटी च्या जुन्या नाल्यांची दुरुस्ती सुरू असल्याने याकडे लक्ष दिले जाणार आहे.