नागपूर : सध्या कोळसा टंचाईचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधाराज जाण्याची भीती वर्तविली जात आहे. या दरम्यान नागपूरमधील महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. हा प्रकार एका ट्रकच्या संबंधित असला तरी यात अधिकाऱ्यांपासून तर कंत्राटदारांपर्यंतची मोठी साखळी गुंतली असल्याचे समोर येत आहे.
कोराडी औष्णिक केंद्राला शहराच्या नजीक असलेल्या कोळसा खाणीमधून दररोज चांगल्या दर्जाचा कोळशाचा पुरवठा केला जातो. याकरिता महानिर्मितीने बी.एम.एच. कंपनीला कोळाशाच्या पुरवठ्याचे कंत्राट दिले आहे. कोळशाची अदलाबदली होऊ नये याकरिता पुरवठादाराच्या सर्व गाड्यांची नोंदणी करण्यात आली आहे. प्रत्येक गाडीवर जीपीआरएस सिस्टिम लावण्यात आली आहे. त्याशिवाय दुसऱ्या गाडीने पुरवठा करता येत नाही. कोळशाची गाडी महानिर्मितीच्या आवारात येताना अतिशय बारकाईने तपासणी केली जाते. अशी ही फुलफ्रुफ यंत्रणा भेदून २८ सप्टेंबरला एक ट्रक आत आला. सुरक्षा रक्षकांना शंका आल्याने पडताळणी केली असता संबंधित ट्रकची नंबर प्लेट बदलल्याचे आढळून आले. जुन्या नंबरवर स्टिकर लावले होते. त्यात निम्म दर्जाचा कोळसा आढळून आला. त्यामुळे महानिर्मितीत एकच खळबळ उडाली. तोबोडत पोलिस तक्रार करण्यात आली. वाहनचालक, संबंधित कंत्राटदारांची पोलिसांनी चौकशी केली. आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी नेमली आहे.
कोराडी औष्णिक केंद्राला वेकोलीच्या गोंडेगाव कोळसा खाणीतून कोळशाचा पुरवठा केला जातो. वॉश केलाल व चांगल्या दर्जाचा कोळसा घेऊन येथून ट्रक निघतात. ते वाटेत थांबतात. नंतर दुय्यम दर्जाचा कोळसा भरलेला ट्रकला अधिकृत नोंद असलेल्या ट्रकची नंबर प्लेट चिटकवली जाते. तो ट्रक कोराडीत येतो. चांगला कोळसा असलेला ट्रक दुसरीकडे नेला जातो. कोराडीत जवळपास रोज ५० ट्रक कोळसा येतो. एका फेरीसाठी कंत्राटदाराला आठ हजार रुपये मिळतात. त्यानुसार चार लाख रुपये रोजची उलाढाल होते. याशिवाय चांगला व दुय्यम दर्जाच्या कोळसा विक्रीतून होणारी विक्री वेगळीच असते. अनेक वर्षानंतर एक ट्रक कोळसा बदलल्याचे उघडकीस आले. कंत्राटदारांच्या आपसी स्पर्धेतून हा प्रकार उघडकीस आल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार येथे नित्याचाच असल्याने सांगण्यात येते. या व्यवसायात बडे मासे गुंतले आहेत. महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनाही हे माहीत नाही असा समज करून घेण्याचे कारण नाही. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे घडूच शकत नाही असे येथे सुरक्षेत तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचा दावा आहे.
रोजची कमाई ४ लाख
एक ट्रक कोळशाचा बदलल्याने महानिर्मितीचे ८० हजार रुपयांनी नुकसान झाले आहे. रोज सरासरी पाच ट्रक दुय्यम दर्जाचा कोळसा भरून आत घुसवल्या जातात. त्यामुळे रोज चार लाख रुपयांची अफरातफर येथे होते. यावरून या धंद्यात गुंतलेल्यांच्या रोजच्या कमाईचा अंदाज येतो. मंत्र्यांचे नातेवाईक, बडे व्यावसायिक व कंत्राटदारापासून प्रवेशद्वारवर तपासणी करणाऱ्यांपासून तर चालकांपर्यंत यात अनेक जण गुंतले आहेत. यात गुंतलेले दिग्गज असल्याने पोलीस चौकशीच्या माध्यमातून फारकाही हाती लागण्याची शक्यता दिसत नाही.