Cm Tendernama
विदर्भ

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या 'त्या' प्रकल्पामुळे भंडाऱ्याचा चेहरामोहरा बदलणार का?

टेंडरनामा ब्युरो

Bhandara News भंडारा : जलपर्यटनातून विकासाचे नवे दालन खुले करणाऱ्या गोसेखुर्दवरील जलपर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी 547 कोटी रुपयांच्या विकासकामांचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

गोसेखुर्द जलाशयावरील जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 102 कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आल्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कारधालगतच्या परिसरात सोमवारी दुपारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जलपर्यटन प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यकमानंतर सभास्थळी कुदळ मारून मुख्यमंत्र्यांनी एकूण 547 कोटी रुपयांच्या विकास कामांचे प्रतीकात्मक भूमिपूजन केले.

यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी आदी उपस्थित होते.

या प्रकल्पाची वैशीष्ठ्ये

भंडाऱ्यालगत मौंदी येथे असलेला हा जलपर्यटन प्रकल्प जागतिक दर्जाचा आहे. यात नावीन्यपूर्ण जलपर्यटन केंद्र, पर्यटकांसाठी भव्य आसन व्यवस्था, विविध प्रकारच्या खाद्यप्रकारांचे उच्च दर्जाचे उपाहारगृह, पर्यटकांना पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी नावीन्यपूर्ण कृत्रिम तलाव, पर्यटकांसाठी विविध सुविधा, जलतरण तलाव, माहिती केंद्र, कॉन्फरन्स हॉल, व्यवस्थापक आणि कर्मचारी निवास, तरंगते जेट्टी वाहनतळ यांचा समावेश असेल.