CMC Tendernama
विदर्भ

Chandrapur : 3 वर्षांत खताचे शून्य उत्पादन; 'हा' प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : महापालिकेने घनकचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याच्या प्रकल्पासाठी नागपुरातील (Nagpur) विश्वेश हायड्रोटेक कंपनीची निवड केली. मात्र, या कंत्राटदार (Contractor) कंपनीने करारनाम्यानुसार मागील तीन वर्षांत एक मिलीग्रॅम खत देखील तयार केले नाही. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

चंद्रपूर-बल्लारपूर बायपास मार्गावर शहराबाहेर महापालिकेचा घनकचरा डेपो आहे. शहरातील एकत्र होणारा ओला व वाळलेला कचरा येथे एकत्र साठवला जातो. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन वर्षांपूर्वी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू केला जाईल, असे महापालिकेने घोषित केले होते. त्यातून निर्माण होणाऱ्या खताची विक्री केले जाईल, त्यातून रोजगार आणि उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण व करण्याचे मनपाचे नियोजन होते.

त्यासाठी टेंडर प्रक्रिया झाली. नागपुरातील विश्वेश हायड्रोटेक प्रा. लि. या कंपनीला घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कंत्राट देण्यात आले. 28 मे 2020 रोजी या कामाचा कार्यादेश निघाला. महापालिकेने कंपनीशी करार करताना दररोज 140 ते 145 मे. टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. मात्र, तीन वर्षांत एक मिलीग्रॅम खताचीही निर्मिती नाही केली.

घनकचरा कंपोस्ट खत प्रकल्पाबाबत कंत्राटदाराला मुदतवाढ देतानाच दंड बसविण्यात आला आहे. दंडाची रक्कम भरून प्रकल्प पूर्ण करण्याचे कंत्राटदाराने मान्य केले. त्यामुळे तीन दिवसांपासून कामही सुरू झाले आहे. प्रकल्प नियमानुसार पूर्ण होईल, अशी माहिती चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिली.

तीन वर्षांत चारदा मुदतवाढ

यंदा या प्रकल्पाच्या कराराला तीन वर्षे होऊन काम सुरू झाले नाही. आतापर्यंत चारदा कंपनीला मुदवाढ देण्यात आली. या काळात महापालिकेने कंत्रादाराला कारणे दाखवा नोटीस बजावली. पुन्हा आता 13 जून 2023 रोजी एक पत्र महापालिकेने पाठविले. नोटीस मिळताच तीन दिवसांच्या आत उत्तर सादर करा, असे या पत्रात बजावण्यात आले.