Chandrapur Tendernama
विदर्भ

Chandrapur : 'या' अर्धवट पुलामुळे 4 वर्षांपासून रहदारी बंद; कधी पूर्ण होणार काम?

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : भेजगाव मूल तालुक्यातील सिंतळाजवळील उमा नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने (PWD) करोडो रुपये खर्चून मागील चार वर्षांपासून मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाचे बांधकाम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र अद्यापही पूल रस्त्यास ओडला नसल्याने पुलावरून रहदारी बंद आहे. त्यामुळे येथून रहदारी बंद आहे. परिणामी नागरिकांना वाहतुकीसाठी अडचण होत आहे.

सिंतळा भेजगाव येथील शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर शेती नदीच्या त्या काठाला आहे. त्यामुळे पूल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. मात्र चार वर्षे लोटूनही पुलाचे काम अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. हा पूल बांधकाम करताना बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे अपेक्षित होते. 

मात्र, काही शेतकऱ्यांना मोबदला दिला तर काही शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळाला नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सदर पूल रस्त्यात जोडण्यास अडथळा निर्माण केला आहे. परिणामतः मागील वर्षीपासून काम ठप्प पडले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना भूसंपादन केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला देत पुलांचे पूर्ण करावे, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने त्यांनी काम थांबविले आहे. शासन नियमाप्रमाणे त्यांना त्वरित मोबदला मिळावा म्हणून प्रस्ताव वरिष्ठांना पाठवला आहे. लवकरच मोबदला देऊन रस्ता रहदारीस मोकळा केला जाईल, अशी प्रतिक्रिया  प्रशांत वसुले, उपविभागीय अधिकारी बांधकाम विभाग, मूल यांनी दिली.