Indian Railway Tendernama
विदर्भ

Chandrapur : 34 कोटी मिळाले पण 4 महिन्यांपासून 'या' स्टेशनचे कासवगतीने काम

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : देशात रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत काही मुख्य रेल्वे स्टेशनचे कायापालट केले जात आहे. अश्याच एक मध्य रेल्वेच्या अत्यंत वर्दळीच्या बल्लारशाह रेल्वे जंक्शन विकासासाठी सरकारने 34 कोटींची तरतूद केली आहे. निधी तर आला मात्र मागील चार महिन्यांपासून येथे कासवगतीने काम सुरू आहे. आतापर्यंत पायाभूत काम सुद्धा पूर्ण झाले नाही.

अमृत भारत योजने अंतर्गत रेल्वे मंत्रालयाने घोषित केलेल्या सर्वोत्तम रेल्वे स्टेशनमध्ये चंद्रपूर आणि बल्लारशाहच्या प्रथम क्रमांक जाहीर झाला. वर्षभरापूर्वी या ठिकाणी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयाने लोककला व राष्ट्रीय उद्यान ताडोबातील वन्यजीवांच्या वैभवाला साकारण्यासाठी चित्रकारांनी आपली प्रतिभा दाखविली होती. या योजनेअंतर्गत मास्टर प्लॅनमध्ये विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. या मास्टर प्लॅन अंतर्गत रेल्वे प्रवाशांसाठी उत्तम दर्जाचे सुलभता प्रतीक्षा क्षेत्र, प्रसाधनगृहाची व्यवस्था, एक्सलेटर स्लॅब, फूटओव्हर ब्रिज, प्लॅटफार्म शेल्टर, स्थानकाचे देखणे मुख्य द्वार, प्रवाशांसाठी रस्ता, पार्किंग एरिया, लिफ्ट, टॉयलेट, आकर्षक बगिचे सुशोभीकरण असे अनेक काम केले जाणार आहे. सोबतच कार्यात्मक सुधारणा, इतर प्रशासकीय इमारतींचे नूतनीकरण केले जाईल.

कासवगतीने सुरू आहे कामे : 

रेल्वे स्थानकावरील फ्लॅटफॉर्म क्रमांक 4, 5 व 1 वर प्रवाशांसाठी शेड बनवणे, रेल्वे वसाहतीत नवीन बिल्डिंग उभारणे, स्थानकाच्या मागे पाण्याची टाकी आणि बिल्डिंगचे बांधकाम, गाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी पाइप बसवण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, नवीन फूट ओव्हर ब्रिज, लिफ्टची व्यवस्था आदी कामे केली जात आहे. मात्र हे काम कधी पूर्ण होणार याची कोणतिच ग्यारंटी नाही, कारण संपूर्ण काम हे कासव गतीने सुरु आहे. मात्र लोकांना लवकरात लवकर नवीन स्टेशन पाहण्याची आतुरता लागली आहे. जर आता कामे लवकरात लवकर पूर्ण नाही केली तर या कामांना पावसाळा लागल्यास पुन्हा ब्रेक लागेल. बल्लारशाह स्थानकावर पहिल्या टप्प्यात परिसरातील काही भागांत पाण्याच्या टाक्यांसाठी खोदकाम, इमारतीची निर्मिती व फ्लॅटफॉर्म क्रमांक 4, 5 व 1 वर शेड उभारणीचे काम सुरू आहे. प्रत्यक्ष कामाला 4 महिन्यांआधी सुरुवात झाली होती. पण कासवगतीने काम सुरु असल्याने काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. पावसाळा सुरू झाल्यास या कामांत पुन्हा अडचणी येण्याची शक्यता प्रवाशांनीही बोलून दाखविली. या संबंधित माहिती बल्लारशाह चे स्टेशन मास्टर  रवींद्र नंदनवार यांना विचारली असता, त्यांनी सांगितले की, अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत बल्लारशाह रेल्वे स्टेशनमध्ये विविध विकासकामे  सुरू आहे. संपूर्ण कामांची गुणवत्ताही नियमानुसार दर्जेदार अशीच राखली जात आहे. या कामांची माहिती परियोजनेचे अधिकाऱ्यांकडून जाणून घेता येईल.