Chandrapur Tendernama
विदर्भ

Chandrapur News : गेल्यावर्षी कोसळलेल्या पुलाचे बांधकाम अजूनही सुरूच; काम पूर्ण कधी होणार?

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : राजुरा-माथरा-गोवरी-पोवनी या महामार्गावरील गोवरी गावाजवळ असलेल्या नाल्यावर पुलाचे बांधकाम मागील वर्षी सुरू केले. परंतु पावसाळ्यात निर्माणाधीन पूल कोसळला होता. तरीही यावर्षीसुद्धा ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या पुलाचे बांधकाम सुरू असून, ते पूर्णत्वास येणार काय, असा सवाल केला जात आहे. यंदाही परिसरातील नागरिकांना पुलाअभावी त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राजुरा-माथरा-गोवरी-पोवनी या महामार्गाचे काम मागील तीन-चार वर्षांपासून सुरू आहे. या मार्गावरील विविध पुलांची कामे मागील वर्षी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू करण्यात आली होती. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या वळण रस्त्यावरील रपटे अनेक वेळा वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प होऊन परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. गोवरी नाल्यावर असलेला जुना पूल मागील वर्षी मार्च महिन्यात तोडण्यात आला.

त्यानंतर पुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू केले होते. परंतु 27 जुलै 2023 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्याला मोठा पूर आला व पुरात पुलाची सेंट्रिंग वाहून गेली तर जवळ असलेली जेसीबी मशीनसुद्धा वाहून जाऊन पुलाच्या पिलरला अडकली. परंतु मशीन अडकलेल्या पिलरला व फाउंडेशनला तडे गेले. त्यानंतर फाउंडेशनखालील माती वाहून जाऊन उभा पिलर पाण्यात दबला गेला व तो कोसळला होता.

प्रशासनाने संपूर्ण पूल नव्याने बनविण्याचे काम हाती घेतले, बरेच दिवस काम बंद होते. परंतु यावर्षीसुद्धा ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या पुलाचे बांधकाम सुरू केले असून, हे बांधकाम पावसाळ्यापूर्वी होणार नसल्याचे दिसून येत आहे. यावर्षी सुद्धा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गतवर्षीसारखीच स्थिती :

मागील वर्षी या पुलाच्या बांधकामादरम्यान वाहतुकीसाठी बनविण्यात आलेला रपटा अनेकदा वाहून गेला होता. त्यामुळे अनेक वेळा रहदारी बंद झाली होती. परिसरातील नागरिकांना 10 ते 12 किमीचा फेरा मारून वाहतूक करावी लागली होती. त्यामुळे अनेकांचा वेळ व पैसा वाया गेला होता. यंदाही तीच स्थिती दिसून येत आहे.