Women Education Tendernama
विदर्भ

Chandrapur : चंद्रपूरसाठी सरकारने दिली गुड न्यूज! 'या' कामासाठी तब्बल 547 कोटींच्या निधीला मंजुरी

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : महिलांना रोजगाराभिमुख उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर-विसापूर येथील महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाच्या बांधकामासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शुक्रवारी तब्बल 547 कोटी 27 लाख 5 हजारांच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान केली.

राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विद्यापिठाकडे विशेष लक्ष देत आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची (देशातील पहिले महिला विद्यापीठ) स्थापना केली. या विद्यापीठाच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळ्या विद्याशाखा सुरू करून महिलांना उच्च शिक्षण देण्यास सुरुवात केली. 

शिक्षणाद्वारे महिलांचे सबलीकरण करण्याचे उद्दिष्ट लक्षात घेता, विद्यापीठाने शासनाच्या योजनेनुसार ग्रामीण, आदिवासी भागात उच्च शिक्षण नोंदणी दर कमी असलेल्या महिलांना कौशल्य विकास संदर्भातील अभ्यासक्रम सुरू करून तेथील रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने बल्लारपूरची निवड केली. महिलांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण देऊन सबलीकरण करण्यासाठी अशा पर्यटन विद्यापीठाचे ज्ञानसंकुल उभारण्याचे शिक्षण प्रस्तावित होते. 

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे बल्लारपूर-विसापूर येथे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बांधकामाच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 547 कोटी 27 लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी प्रदान केली आहे. हे बांधकाम 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव' अंतर्गत असून, संपूर्ण निधी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कामाची तांत्रिक तपास पूर्ण

बांधकाम प्रस्तावाच्या अनुषंगाने कामाची तांत्रिक पडताळणी करून उच्चस्तरीय सचिव समितीपुढे प्रस्ताव ठेवण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती करण्यात आली होती. त्यानुसार, उच्चाधिकार सचिव समितीने या इमारतीच्या 547 कोटी 27.05 लाख इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकाला मान्यता मिळाली.

काय असेल ज्ञान संकुलात?

विद्यापीठाने याच ज्ञानसंकुलाच्या दुसया टप्प्याच्या बांधकामासाठी 560 कोटी 91 लाख किमतीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याची पत्रान्वये शासनाकडे विनंती केली. यामध्ये इन्स्टिट्युशनल इमारतींमध्ये एकूण 3 शैक्षणिक इमारती, वर्कशॉप इमारत 1 व 2, ग्रंथालय इमारत, मेस इमारत, प्रेक्षागृह इमारत, लाँड्री इमारतींचा समावेश आहे. निवासी इमारतींमध्ये एकूण 3 वसतिगृह, 3 अतिथीगृह, विशेष अतिथीगृह, तसेच कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत.