Chandrapur Tendernama
विदर्भ

Chandrapur : 20 वर्षे झाली तरी 'या' क्रीडा संकुलाचे काम का आहे अपूर्ण?

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : अनेक कामे अपूर्ण असल्याने कोरपना येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम अर्धवट आहे. ही कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी मागणी क्रीडाप्रेमीकडून व्यक्त होत आहे.

कोरपना येथील क्रीडा संकुलाचे काम निर्मिती प्रक्रियेपासूनच अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यातील काही कामे टप्प्याटप्यात झाली. परंतु, आजपर्यंत एक ही काम पूर्णपणे झाले नाही. त्यामुळे झालेल्या कामाची दुरवस्था होत चालली आहे. आजच्या घडीला क्रीडा संकुलातील विविध खेळाचे मैदाने, पक्की संरक्षण भिंत, विद्युत पथदिवे आदीचे काम झाले नाही. बांधण्यात आलेल्या क्रीडा भवनाची नासधूस झाली असून, येथील दरवाजे खिडक्या, पाइपलाइन, स्टाइल आदी मोडकळीस आले आहे. स्वच्छतागृह ही अस्वच्छतेने बरबटले आहे. 

संकुलाचे मुख्य प्रवेशद्वार मागील वर्षभरापासून तुटून अडगळीत पडले आहे. परंतु त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. अलीकडेच येथे विद्युत मीटर लावण्यात आले. मात्र विद्युत व्यवस्था करण्यात आली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आली. त्यालाही मुबलक पाणी लागले नाही, त्यामुळे दुसरी बोअरवेल खोदण्याची गरज आहे. 

क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात झुडपे ही वाढली गेली आहे. त्यांचे ही व्यवस्थापन होणे महत्त्वाचे आहे. रनिंग ट्रॅक, पादचारी ट्रॅक, सभोवताल वृक्ष लागवड, प्रेक्षागृह, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, खेळण्यासाठी हॉल आदी सुविधा होणे अपेक्षित आहे.

प्रवेशद्वारावर नाही नाम फलक

क्रीडा संकुलातील आज ही अनेक कामे अपूर्ण आहे. यातच 20 वर्षांच्या कालावधीत अद्यापही क्रीडा संकुलाच्या पुढे नामफलक लागलेला नाही. तसेच हा परिसर ही संपूर्ण ओसाड वाटतो. त्यामुळे क्रीडा संकुल कोणते आहे, हे नवीन व्यक्तींना कळत नाही. 'त्या' दृष्टीने येथे फलक लावणे आवश्यक आहे.

क्रीडा विभागाचे दुर्लक्ष

कोरपना येथील तालुका क्रीडा संकुलाकडे निर्मिती काळापासूनच क्रीडा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी हे संकुल अडगळीत पडले आहे. त्याचा फटका या परिसरातील होतकरू खेळाडूंना बसत आहे. तसेच लोकप्रतिनिधीकडूनही यावर पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही.

या संकुलासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. आचारसंहितेनंतर याविषयीच्या सर्व प्रक्रिया पार पडतील. क्रीडा संकुलातील अनेक अपूर्ण सोयी-सुविधा पूर्ण कामे होतील, अशी प्रतिक्रिया जयश्री देवकर, तालुका क्रीडा अधिकारी, कोरपना यांनी दिली.