Chandrapur Tendernama
विदर्भ

Chandrapur : 76 हजार कोटींच्या गुंतवणूक कराराला मिळणार बूस्टर

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर जिल्ह्यात महाऔष्णिक प्रकल्प, सिमेंट कंपन्या, लोहखनिज, लाइमस्टोनवर आधारित उद्योग कार्यरत आहेत. याशिवाय, वन उपजांवर आधारित उद्योगांनाही अतिशय चांगली संधी असल्याने उद्योगांसाठी हा आदर्श जिल्हा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने नियोजन भवनातील 'इग्नाइट महाराष्ट्र 2024' कार्यशाळेत ते बोलत होते. 'अॅडव्हॉटेज चंद्रपूर' उपक्रमात झालेल्या 76 हजार कोटींच्या गुंतवणूक कराराला या कार्यशाळेने बूस्टर मिळाला आहे.

जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, नवउद्योजकांना संधी, शासनाचे धोरण, उद्योगासाठी लागणाऱ्या सेवा, उत्पादन, मार्केटिंग, आर्थिक व अन्य बाबींची माहिती होण्यासाठी 'इग्नाइट महाराष्ट्र' कार्यशाळा घेण्यात आली. उद्योगांसाठी उत्तम स्रोत उपलब्ध असल्याने लोहखनिज व स्टील उद्योगांना संधी आहे. 42 टक्के भूभाग जंगल, ताडोबा अंधारी व्याघ्र संरक्षण प्रकल्पही आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने उद्योगांना चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा आशावाद जिल्हाधिकारी गौडा यांनी व्यक्त केला. उद्योजकांनी विषयाबाबत चर्चा केली.

अॅडव्हॉटेज चंद्रपूरला चालना : 

फेब्रुवारी महिन्यात चंद्रपूरमध्ये 'अॅडव्हॉटेज चंद्रपूर' हा नावीन्यपूर्ण उपक्रम झाला. यात जिल्ह्यासाठी 76 हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. इग्नाइट महाराष्ट्र मध्ये उद्योग क्षेत्रातील नामवंत उद्योजक उपस्थित झाले. सर्वांच्या अनुभवाचा लाभ नवउद्योजक व इतरांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले. या कार्यक्रमात विभागाचे सहसंचालक गजेंद्र भारती, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सूर्या, बांबू संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक अशोक खडसे, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, सहसंचालक स्नेहल ढोक, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या उपमहाव्यवस्थापक उमा अय्यर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राजू नंदनवार आदी उपस्थित होते.