Power Tendernama
विदर्भ

Chandrapur : 90 कोटींचा 'हा' जलविद्युत प्रकल्प 15 वर्षांनंतरही रखडलेलाच

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : पोंभूर्णा तालुक्याला नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे. तालुक्यात अंधारी व वैनगंगा नद्या वाहतात. तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जुनगाव येथील बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील बोरघाट जलविद्युत प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. 90 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होणार होती.

या प्रकल्पामुळे जुनगाव व परिसरातील गावांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असता. अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले असते. मात्र घोषणा होऊन पंधरा वर्षांचा काळ लोटूनही प्रकल्प सुरू न झाल्याने बोरघाट जलविद्युत प्रकल्प अंधारात चाचपडत आहे.

तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जुनगावजवळील वैनगंगा नदीच्या पाण्याचा वापर करून बोरघाटावर जलविद्युत प्रकल्प सुरू करण्याचे काम प्रस्तावित होते.

या प्रकल्पावर अंदाजे 90 कोटी रुपयांचा खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. प्रकल्पाचे टेंडर शक्तीकुमार एम. संचेती यांच्या शक्तीकुमार एम. संचेती लिमिटेड कंपनीला मिळाले होते. प्रकल्पासाठी लागणारी जुनगाव, देवाडा (बु.), घाटकुड व कवटी परिसरातील 50 एकर जमीन कंपनीने घेतली होती. कंपनीने नदीपात्राचे सर्वेक्षण, माती परीक्षण केले होते. मात्र काही दिवसातच कंपनीने आपले काम थांबविले. पंधरा वर्षे लोटूनही घाटकुळ येथील बोरघाट जल विद्युत प्रकल्पाचे बांधकाम व इतर कारवाई थंडबस्त्यातच आहे.

बोरघाट जलविद्युत प्रकल्प सुरू झाल्यास जुनगाव व आजूबाजूच्या परिसरातील बेरोजगारांना काम मिळाले असते. शिवाय तालुक्याचाही विकास झाला असता. मात्र 90 कोटींच्या या प्रकल्पाचे स्विच 'ऑफ' असल्याने येथील बेरोजगार तरुणांची निराशा झाली आहे.

राज्यभर प्रसिद्ध झाले असते जुनगाव

पाण्यापासून वीज निर्माण करून प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करणे, बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर सदर काम प्रस्तावित होते. ते झाल्यास जुनगाव हे गाव वीजनिर्मिती करणारे गाव म्हणून राज्यात ओळखले गेले असते. मात्र अल्पावधीतच कंपनीने आपले काम गुंडाळले असल्याने जुनगाव येथील जलविद्युत प्रकल्प केव्हा पूर्णत्वास येईल असा प्रश्न आता पडला आहे. बोरघाट जलविद्युत प्रकल्प सुरू करण्याची मागणी परिसरातील जनतेनी केली आहे.

जुनगाव बोरघाट जलविद्युत प्रकल्प 15 वर्षांपासून सुरू झाला नसल्याने घोर निराशा झाली आहे. प्रकल्प सुरू झाला असता तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले असते. मात्र शासनाने तात्काळ पुढाकार घेऊन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी प्रतिक्रिया जुनगावचे माजी सरपंच जीवनदास गेडाम यांनी दिली.