SMart Meter Tendernama
विदर्भ

नागपुरात लवकरच लागणार 18 लाख प्री-पेड मीटर्स

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशभरात प्री-पेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 2.25 कोटी प्री-पेड मीटर बसवण्यात येणार आहेत. त्यापैकी नागपूर परिमंडलात (नागपूर व वर्धा जिल्हा) सुमारे 18 लाख मीटर लावण्यात येणार आहेत. नागपूरसह विदर्भात सुमारे 65 लाख प्री-पेड मीटर बसवण्यात येणार आहेत. एका मीटरसाठी 12 हजार रुपये खर्च येणार आहे. 10 वर्षांपर्यंत मीटरची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची असेल.

3 झोनमध्ये 30 लाखांहून अधिक प्री-पेड मीटर लागणार : 

नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया परिमंडळात एकूण 30 लाख 30 हजार 346 प्री-पेड मीटर बसवण्यात येणार आहेत. हे टेंडर 3,635.53 कोटी रुपयांचे आहे. अकोला आणि अमरावती परिमंडळात 21 लाख 76 हजार 636 मीटर बसवण्यात येणार आहेत. हे टेंडर 2607 कोटीत काढले गेले. याचे टेंडर मॉन्टे कार्लो कंपनीला मिळाले आहे. आणि मॉन्टे कार्लो कंपनी जिनस कंपनीकडून मीटर खरेदी करून बसवणार आहे.

मीटर बसवण्याचे काम सुरू :

नागपूरसह विदर्भात प्री-पेड मीटर बसविण्याचे टेंडर अहमदाबाद येथील मॉन्टे कार्लो कंपनीला मिळाले आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये प्री-पेड मीटर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. महावितरणच्या वतीने सर्व प्रथम शासकीय कार्यालयातील महावितरण कंपनीच्या निवासस्थानी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरी प्री-पेड मीटर बसविण्यात येत आहेत. नागपूर जिल्ह्याबाबत (शहर आणि ग्रामीण) 18 लाख प्री-पेड मीटर (कृषी पंप वगळता) बसवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात बसवल्या जाणाऱ्या 2.25 कोटी प्री-पेड मीटरसाठी 39 हजार 602 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. यासाठी केंद्राकडून अनुदान मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने 6 हजार 294 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.