Narendra Modi Tendernama
विदर्भ

PMFME : 'या' उद्योगांसाठी तुम्ही अर्ज केला का? सरकारने दिला कोट्यवधीचा निधी

टेंडरनामा ब्युरो

वाशिम (Washim) : शेतकऱ्यांचे उद्योगप्रति मनोबळ वाढविण्यासाठी केंद्र सरकारने (PMFME) पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग प्रक्रिया योजना सुरु केली. केंद्र शासनाच्या आर्थिक मदतीतून प्रत्येक जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग (पीएमएफएमई) प्रक्रिया योजना राबविली जात आहे. आर्थिक वर्षे 2024-25 मध्ये जिल्ह्याला 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून 278 उद्योग उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रक्रिया उद्योग सुरु करायचे असल्यास कृषी विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

कृषि क्रांति घडून यावी म्हणून सरकार नवनवीन संशोधन करत आहे. सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढविण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. नवीन सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी 2024-25 पर्यंत ही योजना लागू आहे. सर्व प्रकारच्या नवीन व कार्यरत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत लाभ देणे. स्थानिक उत्पादनांना या योजने अंतर्गत प्रोत्साहन देण्यात येते. 10 ते 40 टक्के लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बैंक मुदत कर्ज घेण्याची तयारी असावी लागते. त्यानंतर प्रकल्प खर्चाच्या जास्तीत जास्त 35 टक्के आणि 10 लाखांपर्यंत अनुदान मंजूर केले जाते. 35 टक्क्यापर्यंत सबसिडी दिली जाते.

कशी आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना?

केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत ही योजना सुरू केली आहे. अन्नपिकांवर प्रक्रिया उद्योग सुरु केल्यास प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के आणि जास्तीत जास्त 10 लाखांपर्यंत अनुदान देय आहे. शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

या उद्योगासाठी मिळणार कर्ज : 

या योजनेमध्ये नाशवंत फळपीके, कोरडवाहू पिके, भाजीपाला, अन्नधान्ये, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मसाला पिके व गुळ इत्यादीवर आधारीत उत्पादने, दुग्धव्यवसाय व पशुखाद्य निर्मिती उद्योग सागरी उत्पादन, मांस उत्पादने व वन उत्पादनांचा समावेश आहे. योजनेच्या लाभासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला अर्ज करता येतो. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून 278 प्रस्तावांचे उद्दिष्ट आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी उद्योग उभारण्यासाठी पुढे येऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन वाशिमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आरिफ शहा यांनी केले आहे. 

असा करायचा अर्ज?

पीएमएफएमई अंतर्गत उद्योग उभारण्यासाठी कर्ज घ्यावयचे असल्यास संबंधित लाभार्थीना pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाइन अर्ज दाखल करता येतो. अधिक माहितीसाठी जिल्हा व तालुका कृषी कार्यालयात संपर्क करून माहिती घेता येते.