health Tendernama
विदर्भ

नागपूर जिल्ह्यासाठी 53 अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर; केंद्र सरकार देणार निधी

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : दिवसेंदिवस ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढत आहे. यासाठी शिक्षण, आरोग्य यासह मूलभूत सुविधा आणि संसाधने वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजनांवर काम केले जात आहे. ग्रामीण भागातील आरोग्य योजनांना सरकारने प्राधान्य दिले आहे. अनेक ग्रामपंचायतींचा विकास करून त्यांचे नगरपरिषदांमध्ये रूपांतर केले जात आहे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा ठिकाणी अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर (UHWC) उभारण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यासाठी अशी 53 केंद्रे मंजूर झाली आहेत. त्यापैकी 20 केंद्रे शहरांमध्ये आणि 33 केंद्रे ग्रामीण भागात सुरू करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातून यासाठी लवकरच निधी मिळणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातून निधी मंजूर

पहिल्या टप्प्यात 20 केंद्रे सुरू होतील. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ग्रामीण भागात अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर्स (UHWC) सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. झोपडपट्टीत राहणारे, कामगार वर्ग आणि स्थलांतरित नागरिकांसाठी ही केंद्रे प्राधान्याने सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये एक एमबीबीएस डॉक्टर, एक परिचारिका, एक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, एक सफाई कामगार आणि एक सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 20 ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

सामान्य तपासणी आणि होणार उपचार : 

या केंद्रांमध्ये वेळ दुपारी 2 ते 10 पर्यंत असेल. ही केंद्रे सुरू करण्यासाठी नगरपरिषद, नगर पंचायत क्षेत्रातील सरकारी इमारतींचा वापर केला जाणार आहे. ज्या इमारतींचा वापर होत नाही तेथे ही केंद्रे सुरू होतील. ज्या ठिकाणी इमारती उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी भाड्याने जागा घेऊन केंद्रे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या सामान्य तपासणी आणि उपचाराच्या सुविधा असतील.

येथे सुरु होणार केंद्र : 

अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर सुरू केल्याने सरकारी आरोग्य केंद्रांवरील ताण कमी होईल. नागरिकांना त्यांच्या परिसरात सरकारी आरोग्य सुविधा मिळू लागतील. सध्या त्याचा नकाशा तयार करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत ही केंद्रे सुरू होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी काही ग्रामीण भाग निश्चित करण्यात आले आहेत. मोहपा, वाडी, वानाडोंगरी, मोवाड, खापा, महादुला, कन्हान, काटोल, दत्तवाडी, कामठी, कळमेश्वर, रामटेक, उमरेड, सावनेर, हिंगणा, मौदा, पारशिवनी, कुही आदी गावे केंद्रे तयार करण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. केंद्रातील सेवा सुविधांसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या केल्या जातील. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात दर मंगळवारी मुलाखतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.