Karnataka Power Corporation Limited Tendernama
विदर्भ

328 कुटुंबांसाठी गुड न्यूज; 'या' कुटुबांना मिळणार 40 कोटींचे पुनर्वसन पॅकेज

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : भद्रावती तालुक्यातील कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या खुल्या कोळसा खाणीमुळे बरांज मोकासा, चेक बरांज, तांडा आणि पिपरबोडी गावांचा मागील 15 वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न रखडला होता. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर 328 कुटुंबांना 40 कोटींचे पुनर्वसन पॅकेज जाहीर झाले आहे. त्यामुळे सध्या तरी या गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाला आहे.

या अंतर्गत नियोजन भवन येथे 23 लाभार्थ्यांना 2 कोटी 73 लाखांचे धनादेश वाटप पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, महानगर पालिका आयुक्त विपीन पालीवाल, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार (भूसंपादन), अतुल जटाळे (पुनर्वसन), बरांज मोकासाच्या सरपंचा मनीषा ठेंगणे, प्रवीण ठेंगणे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्वाती हर्षल पारखी आणि लता बाळू गेडाम यांना मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश वाटप करण्यात आले.

2015 ते 2021 पर्यंत खाण होती बंद :

कर्नाटका पॉवर कॉपोरेशन लिमिटेड ही कोळसा खाण सन 2015 ते 2021 या कालावधीत बंद होती. खाण सुरु झाल्यानंतर कंपनीने प्रकल्पग्रस्तांना कोणताही मोबदला दिला नाही. प्रकल्पग्रस्त कुटुंबांना बंद काळातील पुनर्वसन पॅकेज मिळवून देण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. या संदर्भात त्यांनी केंद्रीय कोळसा मंत्री रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेतली. अखेर बरांज मोकासा, तांडा आणि चेकबरांज, पिपरबोडी येथील 328 कुटुंबांना 40 कोटींचे पुनर्वसन पॅकेज जाहीर झाले.