नागपूर (Nagpur) : शहरातील सिमेंट रस्ते पन्नास वर्षे टिकतील, असा दावा केला जातो. परंतु दोन वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या अंबाझरी तलावापुढील रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने नागरिकही आता बांधकामाबाबत शंका व्यक्त करीत आहेत. पावसाच्या एका दणक्यात या रस्त्याच्या बांधकामाचे पितळ उघडे पडले.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन वर्षापूर्वी अंबाझरी ओव्हर फ्लोसमोरील सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. सिमेंट रस्त्याच्या बाजूने फूटपाथ तयार करण्यात आले. रस्त्याच्या काही भागामध्ये आयब्लॉक लावण्यात आले होते. शनिवारी पहाटे झालेल्या तीन तासांच्या पावसाने अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला. या ओव्हर फ्लोच्या पाण्याच्या प्रवाहात हा रस्ताच वाहून गेला. रस्त्यावरील सर्व आयब्लॉक डागा ले-आऊटमधील गल्ल्यांमध्ये दिसून आले. एवढेच नव्हे या रस्त्यावर चार फूटापर्यंत खोल खड्डे पडले आहेत.
काही भागात रस्त्याखालील माती वाहून गेली आहे. सकाळी अनेकांना येथे रस्ता होता की नाही, असा प्रश्न पडला. दोन वर्षापूर्वीच तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची दुर्दशा बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पाण्याचा वेगवान प्रवाहामुळे रस्त्यांच्या अनेक भागात उंचवटा तयार झाला. एकूणच या रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाचेच पितळ उघडे पडल्याचे चित्र आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या या रस्त्यांच्या बांधकामाने मोठमोठी दावे करणाऱ्या नेत्यांनाही तोंडघशी पाडल्याचे दिसून येत आहे. ज्या कंत्राटदाराने हा रस्ता बांधला, त्याच्यावर आता कुठली कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रात्री धो-धो बरसला अन सकाळी निघून गेला, परंतु रोजीरोटी सोडून दिवसभर आपल्या झोपडीतील ओले झालेले आयुष्य झोपडी समोरच वाळवताना दिसले. पावसाने दिलेल्या यातना सहन करीत असल्याचे सांगतानाच चिल्यापिल्यांना खाऊ घालण्यासाठी वाहून गेलेला संसार पुन्हा तीन विटांवर अनेक झोपडपट्यांमध्ये सायंकाळच्या समयी सजविला गेला. शहरातील अनेक झोपडपट्यांमधील संसार विस्कलटले. अनेकांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी यांनी निर्देश द्यावा. प्रत्येक झोपडपट्टीत महसुल अधिकाऱ्यामार्फत त्वरित पंचनामा करण्यात यावा. प्रत्येक झोपडपट्टीधारकाला नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी माहिती प्रा. राहुल मून, संविधान परिवार. नागनदी काठावरील, भांडेवाडी कचरा डम्पिंग परिसर व रिंग रोड च्या खोलगट भागातील रहिवाशी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रभावित झाले आहेत. नागरिकांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. झोपडपट्टीतील रहिवाशी नागरिकांना सानुग्रह मदत देण्यात यावी. या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले आहे.