jail Tendernama
विदर्भ

सुरक्षा ठेव घोटाळा : १० ठेकेदार जाणार जेलमध्ये

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागात कोट्यवधीचा सुरक्षा ठेव घोटाळा करणाऱ्या दहा कंत्राटदारांवर मंगळवारी सदर पोलिसांनी तब्बल ८ महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. सरकारच्या फसवणुकीची ही रक्कम १ कोटी २३ लाख ८९ हजार ३०० रुपयांची आहे. गुन्हा दाखल होताच इतर कंत्राटदारांचे धाबे दणाणले असून याप्रकरणी अनेक कंत्राटदार रडारवर आहेत.

जिल्हा परिषदेतील लघु सिंचन पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता असलेले बंडू सयाम यांनी हा घोटाळा उघडकीस आणला असून त्यांच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संजय लक्ष्मणराव बक्से रा. काटोल, संजय मारोतराव बडोदेकर (४९) रा. नरखेड, महेंद्र पांडुरंग चिचघरे रा. सूर्यनगर नागपूर, विकेश धर्मदा हजारे रा. रमना मारोती नगर, संजय शितलाप्रसाद पांडे (३१) रा. मानेवाडा, नीलेश सुरेशराव हिंगे (३५) रा. रमना मारोती रोड, ओमप्रकाश महादेवराव बरडे (३१) रा. लोहारी सावंगा नरखेड, महेश हरिदास गादेवार (२८) रा. जुनी मंगळवारी, रमेश केमुरी रा. हिवरीनगर आणि संदीप अरुणकुमार अवचट (४२) रा. इतवारी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंत्राटदार आरोपींची नावे आहेत.

या सर्व कंत्राटरांनी जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागात विकास कामांच्या निविदा मंजूर झाल्या नंतर कॉन्ट्रक्ट मिळून करारनामा केला. त्याकरीता सुरक्षा ठेव, अनामत रक्कम व कामाचा दोष निवारण कालावधी पूर्ण झालेला नसताना दोन कामाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी एकच सुरक्षा ठेव रक्कम आणि परफॉरमन्स अनामत रक्कम वापरली. ही रक्कम मुदतपूर्व काढून घेतली. त्यासाठी लघु सिंचन विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही. आरोपी कंत्राटदार रमेश केमुरी आणि संदीप अवचट यांनी धामणगाव आणि कामठी येथील काम मिळविण्यासाठी बनावट डीडी, सुरक्षा ठेव, परफॉरमन्स अनामत रक्कम आणि एफडी सादर करून निविदा प्रक्रीयेचे काम सुद्धा मिळविले. त्यामुळे सर्व दहाही कंत्राटदारांनी जिल्हा परिषदेची १ कोटी २३ लाख ८९ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. हे संपूर्ण प्रकरण मार्च २०१९ ते जानेवारी २०२२ दरम्यानचे आहे.