Akot Tendernama
विदर्भ

अकोट शहरातील विकास कामांना दणका; 12 कोटींच्या टेंडरला स्थगिती

टेंडरनामा ब्युरो

अकोला (Akola) ः अकोट (Akot) तालुक्यातील लोकशाहीर अण्‍णा भाऊ साठे नागरी सुधार योजनेबाबत झालेल्या तक्रारीमुळे अकोट शहरातील विकास कामांची चौकशी होईपर्यंत कामांना स्थगिती देण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी अकोट नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. अकोट नगपरिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भारिप-बमसचे दिवाकर गवई यांच्या तक्रारीनंतर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी समाज कल्याण विभागालसा दिले होते.

अकोट नगर परिषदेने शहरातील विविध प्रभागातील सुमारे १२ कोटी रुपयांची विकास कामे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी सुधार योजने मधून मंजूर करून टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे दिवाकर गवई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी टेंडरमधील काही कामे ही दलित वसाहतीमधील नसल्याचा आरोप केला होता. अकोट नगर परिषद अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यावर काही न. प. पदाधिकाऱ्यांसोबत संगनमत केल्याचा आरोप तक्रारीत केला होता.

समाज कल्याण विभाग अकोला येथील अधिकाऱ्यांवरही तक्रारकर्त्यांनी अनुसूचित जाती, दलितांची लोकसंख्या नसताना अहवाल देताना दलित वस्तीच्या निकषाप्रमाणे आढळून आल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला होता. केवळ दलित वस्तीतच निधी वापरावा लागत असतानाही इतत्र निधी वगळून शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला होता. लेंडी नाल्याचे मंजूर काम अपूर्ण असताना व निधी शिल्लक असताना येथे पुन्हा निधी देवून काम प्रस्तावित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय शासनाच्या निकषांचे उल्लंघनही नगर परिषद प्रशासनाकडून होत असल्याचे तक्रारीत नमूद होते.

गवई यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अकोट न. प. मधील नागरी दलित वस्ती सुधार योजनेतील कामांच्या चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी चौकशी होईपर्यंत पुढील आदेशापर्यंत कामे स्थगित ठेवण्याबाबतचे पत्र न. प. मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.