नागपूर (Nagpur) : नरखेड (Narkhed) व काटोल (Katol) तालुक्यातील नदीवरील पूल मोडकळीस आल्याने येथे नवीन पुलाच्या बांधकामाला सुरवात करण्यात आली. मात्र, तीन वर्षे होऊनही या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काटोल ते वरुड हा महामार्ग झाल्यानंतर या मार्गात असलेल्या पारडसिंगा, भारसिंगीजवळील जाम व जलालखेडा जवळच्या वर्धा नदीवर पुलांचे बांधकाम मंजूर होते. पुलांच्या बांधकामालाही सुरुवात करण्यात आली. पण मार्च २०२० मध्ये कोरोना आल्याने सर्व कामे विस्कळीत झाली. तेव्हापासून बंद असलेले पुलाचे बांधकाम अद्याप सुरू करण्यात आले नाही.
पुलाला पर्याय म्हणून एक कच्चा वळण मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकवेळा अपघात होत आहेत. एनएचआयचे अधिकारी या कामाबाबत गंभीर नसल्याने दिरंगाई होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे बांधकामाला होणाऱ्या दिरंगाईची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
जीवनी, जाम व वर्धा या तीन नदीवरील या पुलाच्या बांधकामाला तीन वर्षांपूर्वी सुरवात करण्यात आली. या काळात पुलाच्या कॉलमचे बांधकाम कुठे पूर्ण तर कुठे अपूर्ण करून सोडण्यात आले आहे. भारसिंगी जवळील जाम नदीवर पुलाचे स्लॅब वेगळे करून ठेवण्यात आले आहे. पण स्लॅब टाकण्यापूर्वीच मार्च २०२० पासून काम बंद करण्यात आले व ते अद्यापही सुरू करण्यात आले नाही.
वळण मार्गावरूनच सुरू आहे वाहतूक
या तिन्ही नद्यांवर असलेल्या जुन्या पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे. यातील दोन पूल तर खूपच जुने झाले आहेत. तीन ही पुलाच्या दोन्ही बाजूने वळणमार्ग आहेत. यामुळे अनेकवेळा येथे अपघात होत असतात. यामुळे वाहतूक धोकादायक ठरण्याची दाट शक्यता आहे. या पुलाच्या बांधकाम दर्जेदार व नियोजित काळात पूर्ण व्हावे, यासाठी अधिकाऱ्यांना पत्र व निवेदने देत वारंवार मागणी केली. परंतु, कुणीही नागरिकांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही.