Sudhir Mungantiwar Tendernama
विदर्भ

सुधीर मुनगंटीवारांना धक्का;ताडोब्याजवळ विमानतळाचा प्रस्ताव फेटाळला

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : राज्याचे माजी अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना मोठा झटका बसला आहे. आजूबाजूला जंगल आणि वन्य प्राण्यांचा वावर असल्याने पर्यावरण विभागाने राजुरा येथे विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

ताडोबा येथे जंगल सफारीसाठी देशभरातून पर्यटक येत असतात. जंगल सफारीत वाघ हमखास दिसणारे ताडोबा एकमेव जंगल आहे. पर्यटकांमुळे मोठा रोजगार या भागात उपलब्ध झाला आहे. मोठमोठे रिसॉर्ट येथे उपलब्ध आहेत. अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर यांच्यापासून अनेक सेलिब्रिटी येथे जंगल सफारीसाठी येत असतात. विमानाने येणाऱ्या पर्यटकांना नागपूर विमानतळावर उतरावे लागते. येथून चारचाकी वाहनाने ताडोबा येथे जावे लागले. त्यामुळे ताबोडाजवळच विमानतळ उभारण्याचा प्रयत्न सुधीर मुनगंटीवर यांच्यामार्फत सुरू होता.
विमानतळासाठी शंभर कोटींचा प्रस्ताव त्यांनी आपल्या कार्यकाळात तयार केला होता. सुमारे ७५ हेक्टर जमिनी अधिग्रहित केली जाणार होती. मात्र प्रस्तावित जमिनीपैकी २७ हेक्टरर जमीन संरक्षित जंगलाची जागा आहे. सोबतच मोठ्‍या प्रमाणात झाडांची कत्तल करावी लागणार होती. वनप्रण्यांनाही येथून विस्थापित व्हावे लागले असते. त्यामुळे या प्रकल्पाला नकार देण्यात आल्याचे समजते.

मनुगंटीवार यांना हा निर्णय रुचला नाही. राजकीय आकसाने यास विरोध केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राजुरा येथे ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे. मेक इन इंडिया अंतर्गत अनेक उत्पादने येथे विकसित केली जात आहे. त्यामुळे विमानतळ आवश्यक आहे. काही अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याने हा प्रकल्प राखडला आहे. मात्र याकरिता आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे मुनगंटीवार यांचे म्हणने आहे.

एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात दोनशे वाघ आहेत. इतरही वन्यप्राणी आहेत. विमानतळ उभारण्यासाठी जंगल कापल्यास हा प्रकल्प त्यांच्यासाठी विनाशकारी ठरले. आधीच येथे वन्यप्राणी आणि मानवांमध्ये संघर्ष सुरू आहे. विमानतळाच्या सभोवताल सुरक्षा भिंत बांधावी लागते. त्यामुळे वन्यप्राण्यांचा भ्रमण मार्गात अडथळे येतील. त्यांच्या मुक्त हालचालीवर मर्यादा येतील. एखाद्या जंगलाजवळ विमानतळ उभारणे धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे विमानतळ नकोच अशी भूमिका पर्यावरणवाद्यांची आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (एमएडीसी) अधिकाऱ्यांनीसुद्धा या फाईलवर नकारात्मक टीपणी केली आहे.