नागपूर (Nagpur) : स्वच्छता निरीक्षक यातील आर्थिक घोटाळा थंड होत नाही, तर मेडिकलमध्ये दुसरा आर्थिक घोटाळयाचा प्रकार समोर आला आहे. उपचारातून बरे झाल्यानंतर रुग्णालयात पैसे भरतात. शुल्क भरण्याच्या पावतीमध्ये हेराफेरी करून चोरी करण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून लाखों रुपयांची हेराफेरी करण्यात आली आहे. या प्रकरणात खिडकी क्रमांक 66 मधील कर्मचाऱ्यांसह मोठे मासे गुंतले असावेत अशी चर्चा रंगली आहे.
मेडिकलमध्ये उपचारातून बरे झाल्यानंतर चाचण्या, खाटा व इतर शुल्क येथे भरावे लागते. रुग्णांच्या डिस्चार्ज कार्डावर 500 रुपये भरायचा शेरा असल्यास रुग्णांकडून पाचशे रुपये वसूल केले जाते. रुग्णाला मिळालेल्या पावतीत पाचशे रुपयांची नोंद बरोबर दिसते. परंतु मेडिकल प्रशासनाला सादर करण्यात येणाऱ्या ऑफिस पावतीमध्ये मात्र पाचशे ऐवजी शंभर रुपये नोंद केली जात असल्याचा प्रकार पुढे आला. मागील तीन महिन्यांपासून अशाप्रकारे गैरप्रकार सुरू असून याची खबर प्रशासनाला नव्हती. दर दिवसाला 20 ते 30 रुग्णांच्या पावत्यांमधील शुल्कामध्ये अशी हेराफेरी होत आहे. रुग्णांची केवळ 10 ते 20 टक्के रक्कम मेडिकलच्या खात्यात भरली जात होती.
हेराफेरी करणारी खिडकी क्रमांक 66 रुग्ण दारिद्र्यरेषेखाली नसताना त्याला बीपीएलच्या यादीत दाखवण्यात येत होते. एमआरआयसाठी 2200 रुपये शुल्क रुग्णांकडून घेतल्यानंतर त्याला बीपीएल यादीत दाखवायचे, असेही प्रकार चौकशीतून पुढे येत असल्याची जोरदार चर्चा मेडिकलमध्ये आहे. या आर्थिक गैरप्रकराची गंभीर दखल अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी घेतली. तत्काळ वैद्यकीय अधिक्षक डॉ. शरद कुचेवार, डॉ. मोहमद फैजल, डॉ. मनीष ठाकरे, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांचा समावेश असलेल्या चौकशी समितीसमोर खिड़की क्रमांक 66 मध्ये हेराफेरी करणाऱ्या सात ते आठ कर्मचाऱ्यांनी सोमवारी हजेरी लावली.
असे आले प्रकरण उजेडात
एका दाखल रुग्णाला सुटी झाल्यानंतर 570 रुपये शुल्क आकारण्यात आले. नियमाप्रमाणे 670 रुपये अदा केले. सर्जरी विभागात त्याने उपचार घेतले होते. ऑनलाइन पद्धतीने त्याच्या दोन पावत्या तयार झाल्याचे पुढे आले. 570 रुपयांच्या पावती क्रमांकावर लिपिकाने ऑफिस कॉपी असलेल्या पावतीमध्ये केवळ 120 दाखवले आणि मेडिकलच्या खात्यामध्ये ते जमा केले. एका रुग्णांकडून 450 रुपये या कर्मचाऱ्याने चोरी करून ते खिशात घातले. दुसऱ्यांदा उपचारासाठी आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने बघितले असता, 120 रुपयांची नोंद होती. तर रुग्णाच्या पावतीवर 570 रुपये अदा केले होते, अशी नोंद होती, यामुळे हा प्रकार पुढे आला.