नागपूर (Nagpur) : शालेय पोषण आहार योजनेच्या माध्यमातून शासकीय शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात येतो. त्यासाठी शासनाकडून धान्याचा पुरवठा होतो. तर इंधन व भाजीपाला आदींसाठी शिक्षण संचालनालयाकडून शाळांना पैसा उपलब्ध करून दिल्या जातो. शिक्षण संचालनालयाने सर्व शाळांकडील शिल्लक पैसा व्याजासह परत करण्याचे निर्देश सहा महिन्यांपूर्वी दिले होते. त्यानुसार जि.प. शिक्षण विभागाकडे जिल्ह्यातील २७९१ शाळांकडून अखर्चित असलेली १ कोटी २५ लाख ८७ हजारावरची रक्कम जमा झाली असून, ती शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात २८०१ वर शाळांमधील ३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात येतो. कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना या आहाराचे धान्य स्वरूपात वितरण करण्यात आले होते. संचालनालयाने या योजनेची अंमलबजावणी झाल्यापासून इंधन, भाजीपाला, तेल, तिखट, मीठ आदी किराणा साहित्यासोबतच बारदाना विक्रीतून जमा झालेला निधी व शालेय पोषण आहाराची शिल्लक व्याजासह परत करून बँक खाते झिरो बॅलेन्स ठेवा, असे निर्देश दिले होते. त्याआधारे जि.प.च्या शिक्षण विभागाच्या शालेय पोषण आहार विभागाने सर्व शाळांकडून त्यांच्या खात्यामध्ये शिल्लक असलेल्या पैशाची माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या.
तालुकास्तरावरून शाळांकडील अखर्चित निधीची जुळवाजुळव झाली. त्यात अनेक शाळांचे बँक खाते पूर्वीच झिरो होते. तर काहींच्या खात्यात रक्कम शिल्लक होती. २७९१ शाळांकडून जि.प.कडे तब्बल १ कोटी २५ लाख ८७ हजार ४४४ रुपयांचा निधी अखर्चित असल्याचे पुढे आले आहे. तालुकास्तरावरून जि.प. शिक्षण विभागाकडे हा निधी वळता झाला असून, तो शिक्षण संचालनालयाकडे पाठविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ही रक्कम पाठविण्यात येत आहे.