नागपूर (Nagpur) : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने (Nagpur Metropolitan Region Development Authority) पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १४०४ फ्लॅट उभारण्यात आले असून, त्यासाठी तब्बल ६ हजार ७७२ इच्छुकांनी अर्ज केला आहे. त्यापैकी १२३१ जणांना पीएम आवास योजनेची लॉटरी लागली आहे.
फ्लॅटची संख्या मर्यादित होती. त्या तुलनेत पाच पट अर्ज आले. त्यामुळे फ्लॅट वितरण करताना महानगर विकास प्राधिकरणाची चांगलीच तांरबळ उडाली होती. ज्यांना लॉटरी लागली नाही ते थेट पक्षपात केल्याचा आरोप करीत असल्याने प्रत्येकाची समजूत काढण्याचे आव्हान प्राधिकरणासमोर आहे.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सदनिकांकरीता सोडत जाहीर केली होती. एकूण ६७७२ अर्जदारांनी प्रत्येकी दोन हजार रक्कमेचे आवेदन शुल्क भरून अर्ज केले होते. अशा सर्व अर्जदारांची अंतिम यादी दिनांक संकेत स्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
नागपूर येथे मौजा तरोडी व मौजा वांजरी या प्रकल्पातील उर्वरीत १४०४ सदनिकेची ऑनलाईन सोडत काढण्यात आलेली आहे. लॉटरीमध्ये १२३१ विजेते घोषित झाले असून उर्वरीत लाभार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. भिलगाव येथील सदनिकांचे बांधकाम प्रगती पथावर असून, लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे भिलगाव येथील सदनिकांची लॉटरी लवकरच काढण्यात येणार आहे.
विजेते घोषित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना त्याच्या पत्यावर वाटप प्रस्ताव पत्र व इरादा पत्र लवकरच निर्गमित करण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनाचे निकष पूर्ण करणारे दस्तऐवज प्रकल्प विभाग, गोकुळपेठ कार्यालय येथे सादर करावे व सदनिकेच्या रक्कमेचा भरणा करून सदनिकेचा ताबा घ्यावे, असे आवाहन महानगर प्राधिकरणाचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.